लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोटातील भुकेचा आगडोंब शमविण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा वेळेत व सकस आहार मिळणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांना अद्याप पुरेसा आहार मिळत नसल्याने मुलांमध्ये कुपोषण वाढत असून, महिलांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये मुले सकाळी उपाशी येतात व मध्यान्ह भोजन उशिरा मिळाल्याने अभ्यासावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे चित्र बदलण्यासाठी डेसिमल फाउंडेशनच्या वतीने 'द ब्रेकफास्ट रेव्होल्युशन' प्रोग्राम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांतील ५० हजारांवर विद्यार्थी, महिला याचा लाभ घेत आहेत.
ही स्थिती बदलण्यासाठी डेसिमल फाउंडेशनतर्फे 'ब्रेकफास्ट रेव्होल्युशन' कार्यक्रम २०१४ पासून राबविला जात आहे. 'सशक्त माता-सुदृढ बालक' हा प्रमुख उद्देश असलेला हा उपक्रम यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पालघर, पनवेल, ठाणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, भिवंडी यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, तसेच गुजरात, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या सहा राज्यांत राबविला जात आहे. नीलम जेठवाणी व त्यांचे सुपुत्र डॉ. पंकज जेठवाणी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला. नीलम या दिवंगत सीए शंकर जेठवाणी यांच्या पत्नी असून, ते मूळ यवतमाळचे रहिवासी आहेत. नीलम यांना डॉ. पंकज व डॉ. कमल अशी दोन मुले आहेत. त्यापैकी डॉ. कमल अमेरिकेत वास्तव्यास आहेत. पतीच्या २०११ मधील निधनानंतरही नीलम यांनी सामाजिक कार्याचा ध्यास कायम ठेवला. डॉ. पंकज हे जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना कुपोषित मुले आणि गर्भवती महिलांची उपासमार पाहून अंतर्मुख झाले. मुलांसह मातेलाही पौष्टिक आहार मिळावा, या ध्येयातून आई-मुलाचे विचार जुळून आले आणि 'ब्रेकफास्ट रेव्होल्युशन'ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आज या उपक्रमाशी ४०० संस्था जोडल्या असून, ७०० केंद्रांद्वारे ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना सकस आहार पुरविला जात आहे. अंगणवाडी, शाळा, शेल्टर हाऊस, हॉस्पिटल आदी ठिकाणी ज्वारी, बाजरी, भरडधान्यांसह (मिलेट्स) पोषक आहारतज्ज्ञ डॉक्टर्सच्या सल्ल्याने तयार करून दिला जातो. लाभार्थीची नियमित आरोग्य तपासणी करून 'हेल्थ कार्ड'ही तयार केले जाते.
'टीबीमुक्त' भारत अभियानातही सहभाग 'निक्षय मित्र' हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टीबीमुक्त भारतसाठी हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याचा उद्देश क्षयरोग (टीबी) बाधित रुग्णाला समाजाकडून आधार मिळावा, हा आहे. डेसिमल फाउंडेशन मागील तीन वर्षापासून या अभियानासाठीही काम करीत आहे.
"'द ब्रेकफास्ट रेव्होल्युशन' मुळे विद्यार्थी नियमित शाळेत येत आहे. सकस आहार व स्वच्छतेवर भर दिल्याने मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास होत आहे. मुख्याध्यापकांकडून नियमित आढावा घेतला जातो. आहाराचे वेळापत्रकही तयार केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हा आहार बनविला जातो."- नीलम जेठवाणी, डेसिमल फाउंडेशन