बँक अधिकाऱ्याला ५० हजारांचा गंडा
By Admin | Updated: December 25, 2016 02:34 IST2016-12-25T02:34:12+5:302016-12-25T02:34:12+5:30
कॅनरा बँकेच्या पुणे येथील सर्कल अधिकाऱ्याला आयफोनचे बक्षीस लागल्याचे सांगून ५० हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला.

बँक अधिकाऱ्याला ५० हजारांचा गंडा
फेक कॉल : भामट्याने केली आयफोन व कार बक्षीस लागल्याची बतावणी
यवतमाळ : कॅनरा बँकेच्या पुणे येथील सर्कल अधिकाऱ्याला आयफोनचे बक्षीस लागल्याचे सांगून ५० हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला. वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश सोमेश्वर कुळसंगे रा. वडगाव रोड यवतमाळ हे कॅनरा बँकेच्या पुणे येथील शिवाजीनगर शाखेत सर्कल आॅफीसर म्हणून कार्यरत आहेत. १८ एप्रिलला त्यांना ०११ एसटीडी कोड असलेल्या लँडलाईन क्रमांकावरून फोन आला. पलिकडून अनोळखी व्यक्तीने आपण आॅनलाईन शॉपींग करणारे ग्राहक असल्यामुळे आमची कंपनी डेल्सोथॉन डॉट कॉमकडून आयफोन ५ एस हा मोबाईल बक्षीस देत असल्याचे सांगितले. त्यासाठी डेल्सोथॉन डॉट कॉमवरून लिव्हाईस कॉम्बो सेट खरेदी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावरून कुळसंगे यांनी कॅनरा बँकेच्या क्रेडीट कार्डाचा उपयोग करून लिव्हाईस कॉम्बो सेट खरेदी केला. त्यानंतर पुन्हा संबंधित व्यक्तीचा फोन आला. त्याने आयफोन ५ एससुद्घा पाठविणार असल्याचे सांगितले. नंतर कुळसंगे यांचे नाव रॅईड आॅनव्हील या स्कीम अंतर्गत रेनॉल्डकिड कारसाठी निवडल्याचे सांगितले. ही कार बक्षीस स्वरूपात मिळविण्याकरिता एखादी वस्तू खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सांगून एक लिंकसुद्घा पाठविण्यात आली. कुळसंगे यांनी त्या लिंकवर जाऊन १९ हजार ९९९ रुपयांचे क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
हाती आले धुपाटणे
त्या व्यक्तीने कुळसंगे यांच्याकडे २९ हजार ९९९ रुपयांची मागणी केली. पैसे भरल्यानंतर त्यांना पार्सलमध्ये लिव्हाईस कॉम्बो सेट, गोल्ड प्लेटेड नेकलेस व एक सुटचा कापड आला. त्यात आयफोन नव्हता. कंपनीच्या त्या क्रमांकावर विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. कारबाबतही फसवणूक झाली. अखेर त्यांनी तक्रार केली.