४८६ ग्रामपंचायतीत ‘नवा गडी नवा राज’
By Admin | Updated: May 4, 2015 00:15 IST2015-05-04T00:15:18+5:302015-05-04T00:15:18+5:30
गावाची सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये संख्याबळ जुळविण्याचे ...

४८६ ग्रामपंचायतीत ‘नवा गडी नवा राज’
६ व ७ मे रोजी सरपंचाची निवड : संख्याबळ जुळविण्यासाठी डावपेच
यवतमाळ : गावाची सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये संख्याबळ जुळविण्याचे डावपेच आखले जात आहे. येत्या ६ व ७ मे रोजी जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींमध्ये नवा गडी नवा राज सुरू होणार आहे. सरपंचपदाच्या निवडीसाठी दोन हजार ८४७ विजयी ग्रामपंचायत सदस्यांना तहसीलदारांनी पत्र पाठविले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक आणि २४ ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी पार पडली. २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले. अनेक गावात प्रस्थापितांना हादरे बसले. नवख्यांंना संधी मिळाली. आता सरपंच पदाची निवडणूक होऊ घातली असून यात तरी आपले वर्चस्व रहावे म्हणून प्रस्थापित हालचाली करताना दिसत आहे. संख्याबळाचे गणित आखणे सुरू आहे. अशातच निवडणूक विभागाने ७ व ८ मे रोजी कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड करण्यासाठी ६ व ७ मे हे दोन दिवस निश्चित केले आहे.
सरपंच पदाची निवडीची तारीख निश्चित होताच पुन्हा ग्रामीण वातावरण ढवळून निघाले आहे. गावगाड्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे. संख्याबळ जुळविण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहे. ज्या ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे. अशा ठिकाणच्या सदस्याला फितविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आमच्या पॅनलच्या बाजूने मतदान केल्यास सरपंच अथवा उपसरपंच पदाचे आमिष दिले जात आहे. एकंदरित जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतीमध्ये आता नवा गडी नवा राज येणार असून प्रत्येक गावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र आरक्षणामुळे आधीच ठरलेल्या सरपंच पदाच्या उमेदवारामुळे अनेक गावात ही उत्सुकता दिसत नाही. (शहर वार्ताहर)