४३ डिजिटल शाळांना मिळणार सोलर सिस्टीम
By Admin | Updated: July 16, 2016 02:37 IST2016-07-16T02:37:04+5:302016-07-16T02:37:04+5:30
दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा भराभर डिजिटल होत आहेत.

४३ डिजिटल शाळांना मिळणार सोलर सिस्टीम
६४ लाख ५० हजारांचा निधी : पांढरकवडा, पुसद, आर्णी, घाटंजीसह नऊ तालुक्यांना लाभ
अविनाश साबापुरे यवतमाळ
दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा भराभर डिजिटल होत आहेत. मात्र या डिजिटल प्रगतीला ग्रामीण भागातील अनियमित वीज पुरवठ्याचा अडथळा निर्माण होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आता डिजिटल शाळांना सोलर सिस्टीम पुरविली जाणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या युगाशी ताळमेळ साधत शैक्षणिक विकास करता यावा, यासाठी डिजिटल शाळांची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून शाळा डिजिटल केल्या आहे. मात्र खेडेगावात वीजपुरवठाच सुरळीत नसल्याने डिजिटल अध्यापन करणे अशक्य होत आहे. डिजिटल क्लास रूममधील संगणक, प्रोजक्टर आदी बाबी अव्याहत सुरू राहणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद शाळांची ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने सोलर सिस्टीम (सौरऊर्जा पॅनल) देण्याचा निर्णय घेतला. मानव विकास मिशनअंतर्गत या प्रकल्पासाठी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मानव विकास मिशनअंतर्गत येणाऱ्या पुसद, झरीजामणी, आर्णी, मारेगाव, पांढरकवडा, कळंब, घाटंजी, उमरखेड आणि महागाव या नऊ तालुक्यांमधील डिजिटल शाळांमध्ये हे सोलर पॅनल बसवून देण्यात येणार आहे. या संदर्भात औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्तालयाशी संपर्क साधला असता, निधीला मंजुरी मिळाली असून पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष यांनी करावयाची असल्याचे सांगण्यात आले.
एकमेव यवतमाळ जिल्ह्याची निवड
मानव विकास मिशनअंतर्गत राज्यातील मागास आणि दुर्गम अशा १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र शाळांना सोलर पॅनल पुरविण्याच्या प्रकल्पासाठी एकमेव यवतमाळ जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचे औरंगाबाद आयुक्तालयातून स्पष्ट करण्यात आले. शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी उमरखेड आणि मारेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी संवाद साधला होता. त्यावेळी दुर्गम भागातील शाळांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर या शाळांना सोलर सिस्टीम पुरविण्यात येईल, असे सूतोवाच त्यांनी केले होते. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शाळांना सोलर सुविधा उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.