४३ बॅग सोयाबीन उगवलेच नाही

By Admin | Updated: August 7, 2014 00:03 IST2014-08-07T00:03:32+5:302014-08-07T00:03:32+5:30

एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली.

43 bags of soybeans have not grown | ४३ बॅग सोयाबीन उगवलेच नाही

४३ बॅग सोयाबीन उगवलेच नाही

घाटंजी : एक दोन नव्हे तर तब्बल ४३ बॅग सोयाबीन बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाही. ही घटना तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे घडली. अखेर संबंधित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यावरून कृषी अधीक्षकांनी या शेताला भेट देऊन पाहणी केली.
अजय राजाराम येल्टीवार असे बियाण्यांची उगवण न झाल्याने व्यथीत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची तालुक्यातील सावंगी ठाणेगाव येथे शेती आहे. पावसाच्या लहरीपणाने यंदा दुबार तिबार पेरणी करावी लागली. त्यातच पुन्हा महागडे बियाणे खरेदी करून शेतकरी येल्टीवार यांनी शेतात पेरणी केली. त्यानंतर पाऊसही चांगला आला. मात्र ४३ पैकी एकही बॅग सोयाबीन बियाणे उगवले नाही. या संदर्भात त्यांनी सुरुवातीला सारस कंपनीच्या विक्रेत्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी या प्रकरणी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यांनीही या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर सदर शेतकऱ्याला घाटंजी येथे गतीमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा होणार असल्याची माहिती मिळाली. तसेच या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ गायकवाड उपस्थित राहणार असल्याचे कळले. त्यावरून सदर शेतकऱ्याने प्रशिक्षण कार्यशाळेत हजेरी लावली. तसेच याबाबत सामाजिक न्यायमंत्री मोघे आणि कृषी अधीक्षक गायकवाड यांना तक्रार देऊन पाहणी करण्याची विनंती केली. त्यावरून कृषी अधीक्षक गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमवेत तेथे जावून पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार, डॉ.पार्लावार, डॉ.प्रशांत नाईक उपस्थित होते. सदर शेतकऱ्याला न्याय मिळतो की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 43 bags of soybeans have not grown