४२ कोटींची खरेदी

By Admin | Updated: October 22, 2014 23:23 IST2014-10-22T23:23:40+5:302014-10-22T23:23:40+5:30

दुष्काळ, नापिकी, सोयाबीनचा दगा आदी सर्व विवंचना बाजूला ठेवत वर्षातील सर्वात मोठ्या सणाला प्रत्येकाने बंपर खरेदी केली. कर्मचारी मनसोक्त तर शेतकरी हात राखून खरेदी करीत असल्याचे

42 crores purchase | ४२ कोटींची खरेदी

४२ कोटींची खरेदी

दीपोत्सव : कार, सोने-चांदी आणि कपड्यांवर भर
यवतमाळ : दुष्काळ, नापिकी, सोयाबीनचा दगा आदी सर्व विवंचना बाजूला ठेवत वर्षातील सर्वात मोठ्या सणाला प्रत्येकाने बंपर खरेदी केली. कर्मचारी मनसोक्त तर शेतकरी हात राखून खरेदी करीत असल्याचे बाजारात दिसत होते. दिवाळीच्या पर्वात जिल्हाभरात थोडीथोडकी नव्हे तब्बल ४२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. वाहन, सोने-चांदी, कापड आणि किराणा आदी खरेदीवर प्रत्येकाचा भर होता.
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त. या प्रकाशपर्वात सर्व दु:ख विसरुन प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करतो. कर्मचारी असो की शेतकरी, गरीब असो की श्रीमंत सर्वच जण दिवाळीच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी करतात. गेल्या आठ दिवसांपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सर्व मोठ्या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली आहे. आठ दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी बाजारात दिसत होती.
गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातील मजूर आणि शेतकरीही खरेदी करताना दिसत आहे. बुधवारी नरक चतुदर्शीच्या दिवशी तर संपूर्ण दुकाने हाऊसफुल्ल झाली होती. कोणत्याही दुकानात पाय ठेवायला जागा नव्हती. रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रत्येकाच्या हातात खरेदी केलेल्या साहित्याच्या मोठ्ठाल्या पिशव्या दिसत होत्या.
धनत्रयोदशी, नरक चतुदर्शी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा दिवाळी हा पाच दिवसाचा सण आहे. या शुभपर्वावर खरेदी करणाऱ्यांची धूम असते. वाहन खरेदीसाठी शुभमुहूर्ताची अनेकांना प्रतीक्षा असते. दिवाळीच्या या पर्वात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शो-रूममध्ये मोठी गर्दी दिसत होती. कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहे. अनेकांनी तर दिवाळीच्या पूर्वी वाहनांची बुकींग करून ठेवली आहे. यात सर्वाधिक वाहने दुचाकी आहे. मोटरसायकल, मोपेड आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३० शो-रूममध्ये १४०० दुचाकी वाहनांची बुकींग करण्यात आल्याची माहिती आहे. या वाहनांची किंमत सुमारे सात कोटींच्या घरात आहे. दुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांचीही मोठी खरेदी केली. आलिशान आणि महागडी वाहने खरेदी करण्याकडे शहरी ग्राहकांचा कल वाढला आहे. अशा ५५ वाहनांचे बुकींग आधीच करण्यात आले होते. अनेकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी वाहन आपल्या घरी नेले. या वाहनांची किंमत दोन कोटी २५ लाख रुपयांच्या घरात आहे.
या सोबतच कापड, किराणा, सोने, फटाके आणि इतर साहित्याची मनसोक्त खरेदी करण्यात ग्राहक व्यस्त होते. या गर्दीत मात्र शेतकरी आपल्या खिशाचा सल्ला घेत खरेदी करताना दिसत होता. आवश्यक तेवढी खरेदी करून तो समाधान मानत होता. (शहर वार्ताहर)

Web Title: 42 crores purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.