३६० गावांच्या जहागिरीचा गणेशोत्सव ४०० वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:17 IST2017-08-29T23:17:05+5:302017-08-29T23:17:19+5:30
‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता काही गावे स्वीकारू लागली आहेत. मात्र तब्बल ३६० गावांचा मिळून एकच गणपती बसविण्याची परंपरा पारव्याच्या (ता. घाटंजी) जहागिरीने सुरू केली होती.

३६० गावांच्या जहागिरीचा गणेशोत्सव ४०० वर्षांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता काही गावे स्वीकारू लागली आहेत. मात्र तब्बल ३६० गावांचा मिळून एकच गणपती बसविण्याची परंपरा पारव्याच्या (ता. घाटंजी) जहागिरीने सुरू केली होती. हजारो लोकांसाठी चक्क पुरणाच्या पोळीची पंगत बसायची. चक्क १० दिवस ही जेवणावळ असे. आता जहागिरी गेली. ३६० गावांमध्ये ३६० पेक्षा अधिक गणपती बसतात. मात्र, जहागिरीच्या वाड्यातला गणेशोत्सव ४०० वर्षानंतरही तेवढ्याच दिमाखात साजरा केला जात आहे.
पांढरकवड्यापासून घाटंजीपर्यंत आणि घाटंजीपासून कळंब, राळेगाव तालुक्यांपर्यंतच्या ३६० गावांना कवेत घेणारा परिसर म्हणजे एकेकाळी पारवेकर घराण्याच्या जहागिरीचा परिसर होता. पारवा (ता. घाटंजी) येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर यांचा दिमाखदार वाडा म्हणजे या जहागिरीची राजधानीच. ३६० गावांतील जल, स्थल, पाषाण, जंगल अशा प्रत्येक गोष्टीवर अधिराज्य गाजविणारा हा मालकाचा वाडा गणेशोत्सवात मात्र प्रत्येक गावकºयाचे घर बनून जायचा. वाड्यातल्या गणपतीची मिरवणूक, वाड्यातल्या गणपतीची रोजची आरती आणि विसर्जनाचा प्रसंग म्हणजे ३६० गावांच्या एकोप्याचे दर्शन घडविणारा क्षण.
गणपतीसाठी वाड्यात भव्य असा कोनाडा तयार करण्यात आला आहे. पूर्ण चांदीत बनविलेला हा नक्षीदार कोनाडा एखाद्या राजाच्या सिंहासनापेक्षाही मोठा आहे. गणेशाची भव्य मूर्ती बसल्यावर कोनाडा अधिक खुलतो. कोनाड्याच्या बाहेर देखण्या रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती ठेवण्याची परंपरा आजही कायम आहे. वाड्यातला गणपती तयार करणारा मूर्तिकार वर्षानुवर्षे कायम आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य. पारव्यातील दिगंबर पंचाळ यांच्याकडेच हे काम असायचे. या कामासाठी त्यांना पैशाच्या रुपात कधीही मोबदला दिला गेला नाही. माजी खासदार आबासाहेब पारवेकर यांच्या काळात त्यांना जहागिरीतील ३७ एकर जमीन देण्यात आली.
बाबासाहेब, आबासाहेब यांच्यापासून सुरू असलेली वाड्यातल्या गणेशोत्सवाची परंपरा आज माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या काळातही सुरू आहे. यंदाही वाड्यावर अण्णासाहेब पारवेकर, दत्तात्रय पारवेकर, डॉ. चंद्रहास पारवेकर, सचिन पारवेकर, योगेश पारवेकर, सुहास पारवेकर यांच्या देखरेखीत दिमाखदार सोहळा सुरू आहे.