‘पीए’साठी ४०० शासकीय कर्मचारी स्पर्धेत
By Admin | Updated: December 27, 2014 22:58 IST2014-12-27T22:58:42+5:302014-12-27T22:58:42+5:30
महसूल राज्यमंत्र्यांचे पीए होण्यासाठी सुमारे ४०० शासकीय कर्मचारी स्पर्धेत असून आपली वर्णी लावून घेण्यासाठी गॉडफादरमार्फत लॉबिंगही केली जात आहे.

‘पीए’साठी ४०० शासकीय कर्मचारी स्पर्धेत
महसूल राज्यमंत्री : बायोडाटांचे लागले ढिग, गॉडफादरमार्फत लॉबिंग, ओएसडी-पीएससाठीही रस्रसीखेच
यवतमाळ : महसूल राज्यमंत्र्यांचे पीए होण्यासाठी सुमारे ४०० शासकीय कर्मचारी स्पर्धेत असून आपली वर्णी लावून घेण्यासाठी गॉडफादरमार्फत लॉबिंगही केली जात आहे.
संजय राठोड यांची महसूल राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यापासून त्यांचे ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी), पीए आणि पीए होण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री घोषित झाल्याापासून ही स्पर्धा आणखी वाढली आहे. ओएसडी हा किमान उपजिल्हाधिकारी दर्जाचा असावा असा शासनाचा नियम आहे. त्यासाठी राज्यभरातून अनेक अधिकारी प्रयत्नरत आहेत. त्यात बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्याने बाजी मारल्याची माहिती आहे. आता पीएस आणि सात ते आठ पीएसाठी स्पर्धा सुरू आहे. पीएस हा किमान नायब तहसीलदार दर्जाचा असावा, असा नियम आहे. त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डींग लावली आहे. किमान सात ते आठ पीए वेगवेगळ्या स्तरावर ठेवले जाणार आहे. त्यासाठी तब्बल ४०० शासकीय कर्मचारी इच्छुक आहेत. त्यात काही अन्य जिल्ह्यातीलही आहेत. या शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले बायोडाटा महसूल राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात सादरही केले. त्यात काही आघाडी सरकारमध्ये पीए राहिलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या जुन्या नेत्यांसह अन्य राजकीय व प्रशासकीय गॉडफादरमार्फत फिल्डींग लावल्याचे सांगितले जाते. या लॉबिंगमुळे स्वत: राज्यमंत्रीही त्रस्त झाल्याचे सांगण्यात येते.
इच्छुकांची संख्या प्रचंड आणि पीएच्या जागा कमी असल्याने नेमके कुणाला ‘सिलेक्ट’ करावे याचा संभ्रम राज्यमंत्र्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यातही महसूल खात्याची जबाबदारी असल्याने या क्षेत्रातील माहितगार कर्मचाऱ्याची पीए म्हणून निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. केवळ महसूल विभागातील कामकाजाचीच माहिती असून चालणार नाही तर जिल्ह्यातील ई-क्लास, सी-क्लास जमिनी, गट नंबर, सर्वे नंबर मुकपाठ असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. एकूणच पीए म्हणून महसूल क्षेत्रातील ‘किडा’ अशी ओळख निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांकडे पीएसाठी अधिक कल राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)