चार दिवसांत ४०० कोटी जमा
By Admin | Updated: November 14, 2016 01:38 IST2016-11-14T01:38:58+5:302016-11-14T01:38:58+5:30
गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही.

चार दिवसांत ४०० कोटी जमा
यवतमाळ : गत चार दिवसांपासून चिल्लर पैशासाठी सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे आहेत. मात्र त्यांना चिल्लरच मिळत नाही. एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी चिल्लर नोटा नाही. यामुळे पहाटे सहापासूनच बँकेत रांगा लागल्याचे चित्र यवतमाळात होते. याचा परिणाम रविवारच्या बाजारहाटावरही झाला. पैसेच नसल्याने बाजारात शुकशुकाट होता. चार दिवसात बँकामध्ये ४०० कोटी जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पाचशे आणि एक हजार रूपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. नोटा जमा होत आहे. मात्र चिल्लरच मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यातील २५७ बँक शाखांमध्ये ४०० कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज विविध शाखांच्या व्यवस्थापनाकडून मिळाला आहे. याचे स्पष्ट चित्र ३० डिसेंबरनंतर पुढे येणार आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांच्या १४३ शाखा आहेत. सहकारी बँकांच्या ८९ शाखा आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. या २५७ शाखांपुढे सर्वसामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गत चार दिवसांपासून रांगा कायम आहेत. रविवारी सुटी असल्याने सर्वाधिक गर्दी बँकांच्या शाखांपुढे पाहायला मिळाली. महिला सहाकारी बँकेत ठोक नोटा जमा केल्या, मात्र चिल्लर चलन वितरित केले नाही. यामुळे ग्राहक संतप्त होते. याची नोंद अग्रणी बँक व्यवस्थापनाने घेतली आहे. रविवारी काही एटीएम सुरू झाले. मात्र बहुतांश एटीएम बंद होते. हे एटीएम सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागणार आहेत. (शहर वार्ताहर)