गट, गणांवर ४० आक्षेप झाले दाखल
By Admin | Updated: October 22, 2016 01:31 IST2016-10-22T01:31:42+5:302016-10-22T01:31:42+5:30
जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणावर आक्षेप सादर करण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली.

गट, गणांवर ४० आक्षेप झाले दाखल
मुदत संपली : २५ नोव्हेंबरला अंतिम रचना
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणावर आक्षेप सादर करण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. सुनावणीनंतर २५ नोव्हेंबरला गट आणि गणांची अंतिम रचना आणि आरक्षण जाहीर होणार आहे.
जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि पंचायत समितीच्या १२२ गणांची प्रारूप प्रभाग रचना आणि त्यातील आरक्षण जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदारांनी जाहीर केले होते. २०११ च्या जनगणनेनुसार गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावर २० आॅक्टोबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले. या कालावधीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १५, तर विविध तहसील कार्यालयात २५, असे एकूण ४० आक्षेप दाखल झाले आहे.
यात महागाव, उमरखेड, राळेगाव, केळापूर, आर्णी, दिग्रस, यवतमाळ, बाभूळगाव, वणी आणि दारव्हा तालुक्यातील गट आणि गणांचा समावेश आहे. या आक्षेपांवर आता विभागीय आयुक्त १७ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी घेणार आहे. त्यानंतर गट आणि गणांच्या रचनेला अंतिम रूप देणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर २५ नोव्हेंबरच्या राजपत्रात अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
विधानपरिषद निवडणुकीवर डोळा
विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे डोळे सध्या स्थानिक स्वराज्य मतदार संघातील विधानपरिषद निवडणुकीकडे लागले आहे. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणकीतून अनेकांना ‘बळ’ मिळणार आहे. काहींना ‘वेळे’कडून बळ मिळण्याची अपेक्षा असून काहींना ‘हाता’नेही ताकद मिळण्याची आशा आहे. याशिवाय रिंगणातील काही काहींकडून सदस्यांचे ‘मंगल’ होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी सर्वच गणीत बिघडले तरी, हमखास बळ मिळणारी ही निवडणूक असल्याने सर्वांनाच मतदानाची प्रतीक्षा आहे.