वर्षभरात चार हजार परवाने रद्द
By Admin | Updated: September 7, 2015 02:26 IST2015-09-07T02:26:11+5:302015-09-07T02:26:11+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वजनमापे नियंत्रकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील वजनमापे परवानाधारक विक्रेते व दुरुस्तक संतप्त झाले आहे.

वर्षभरात चार हजार परवाने रद्द
वजनमापे नियंत्रकांची मनमानी : न्यायालयाच्या निकालानंतर काढले परिपत्रक
यवतमाळ : महाराष्ट्र शासनाच्या वजनमापे नियंत्रकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील वजनमापे परवानाधारक विक्रेते व दुरुस्तक संतप्त झाले आहे. वर्षभराच्या कालावधीतच राज्यातील चार हजार परवाने धडाधड रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैध मापनशास्त्र यंत्रणा मोडते. वैधमापनशास्त्र (वजनमापे) यंत्रणेत ४ आॅक्टोबर २०१४ पासून संजय पांडे हे नियंत्रक पदावर रुजू झाले आहे. तेव्हापासूनच वजनमापे परवानाधारकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. पांडे यांनी केंद्र शासन आणि राज्य सरकारने बनविलेले कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू केला आहे. स्वत:चेच नियम परिपत्रकाच्या स्वरूपात बनवून अंमलात आणणे सुरू केले आहे. त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पांडे मनमानीपणे परिपत्रके काढतच आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मनमानी कारभाराने राज्यातील सुरळीत सुरू असलेले वैधमापनशास्त्र परवानाधारकांचे काम खोळंबून पडले आहे. अनेक परवानाधारकांवर बेकारी ओढवल्याचेही म्हटले आहे.
नियंत्रक संजय पांडे यांच्याकडून परवानाधारकावर जाचक अटी लादल्या जात आहे. त्यामुळे दुरुस्तक व वैधमापन विक्रेते यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांच्याशी निगडित व्यापारी व दुकानदारांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वजनमापे परवानाधारकांच्या व्यथा शासनाकडे मांडाव्या, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना जिल्हा वजनमापे परवानाधारक संघटनेचे सचिन बुटले, विनय निळे, नीलेश हरसूलकर, आर.डी. क्षीरसागर, बबन पालवे, भगवान काळे, माया देशमुख, नितीन देठे, राजेश बदे, अतुल सोनकुसरे, गणेश चव्हाण, पवन बोबडे, गुणवंत धाये, अवधुत शिंदे, शंकर हरणे, विलास शिंदे, रूपेश क्षीरसागर, धनंजय मानकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)