३८०० बेनाम रूईगाठींचे गौडबंगाल
By Admin | Updated: October 1, 2015 02:20 IST2015-10-01T02:20:10+5:302015-10-01T02:20:10+5:30
वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे.

३८०० बेनाम रूईगाठींचे गौडबंगाल
साडेपाच कोटींचा मुद्देमाल : सीसीआयवर संशय, अर्ध्या किंमतीत विक्रीची होती तयारी
यवतमाळ : वणी येथील कॉटन प्रक्रिया उद्योगात सध्या रूईच्या त्या ३८०० बेनाम गाठींची चर्चा होत आहे. या गाठी सीसीआयच्या असाव्या, असा संशय आहे. साडेपाच ते सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी काही महिन्यांपूर्वी अर्ध्या किंमतीत विकण्याची आॅफर अनेकांना दिली गेल्याने या गाठी ‘मार्जीन’मधील कापसातून बनविल्या गेल्या असाव्या, असा अंदाज वर्तविला जात आहे.
वणी-पांढरकवडा हा कापसाचा स्ट्राँग बेल्ट आहे. पांढरकवड्यातील कापूस तर सर्वाधिक लांबीमुळे जगात क्रमांक एकचा मानला जातो. कापसाचे दर्जेदार व सर्वाधिक उत्पादन वणी-पांढरकवड्यात होत असल्याने तेथे खरेदीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी सीसीआय व पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी होते. गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस खरेदी संपली. मात्र त्यातील ३८०० रूईगाठींची चर्चा आजही कायम आहे. सूत्रानुसार, या ३८०० रूईगाठी वणी भागातीलच एका राजकीय नेत्याच्या गोदामात अनेक महिने साठा करुन ठेवल्या गेल्या. या नेत्याने हे गोदाम भाड्याने दिले आहे. विशेष असे, या नेत्याने गेल्या वर्षी कापसाचे एक बोंडही खरेदी केले नाही. मग त्याच्याकडे या गाठी आल्या कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक महिने या गाठी पडून राहिल्यानंतर त्या खुल्या बाजारात विकणे धोक्याचे असल्याचे लक्षात आले. म्हणून सहा कोटी रुपये किंमत असलेल्या या गाठी अवघ्या अडीच-तीन कोटीत विकण्याची तयारी केली गेली होती. त्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर आदिलाबादपर्यंत अनेकांना या गाठींची अर्ध्या किंमतीची आॅफर दिली गेली. मात्र बाजारात भाव पडल्याने आणि पकडले जाण्याच्या भीतीने या गाठी घेण्यास कुणी रस दाखविला नाही. अर्ध्या किंमतीत गाठी विकण्याची तयारी पाहता या गाठींमध्ये नक्कीच काही तरी काळेबेरे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रानुसार, या ३८०० गाठी सीसीआयच्या ‘मार्जीन’मधील कापसाच्या असाव्या. गैरमार्गानेच आलेल्या कापसातील या गाठी असल्याने त्या अर्ध्या किंमतीत विकण्याची तयारी दर्शविली असावी, असे दिसते. या गाठींमध्ये राजकीय हितसंबंधही गुंतलेले असल्याचे स्पष्ट• होते. अनेक महिने या गाठी राजकीय नेत्याच्या गोदामात पडून होत्या. अर्ध्या किंमतीतही त्याला खरेदीदार नसल्याचे पाहून या गाठी गोदामातून बाहेर काढून सीमापार नेल्या गेल्या असाव्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)