३२ परीक्षा केंद्रांवर तब्बल ३५ हजारांवर विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:58 IST2019-04-30T21:57:51+5:302019-04-30T21:58:17+5:30
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला.

३२ परीक्षा केंद्रांवर तब्बल ३५ हजारांवर विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला. काही जणांना तर चक्क महाविद्यालयाच्या ओट्यावरही बसविण्यात आले.
महाविद्यालयांतील प्रिंटरच्या अल्पक्षमतेनेही अनेक ठिकाणी तारांबळ उडाली. सततच्या प्रिंट आॅर्डरने मशिन पेटण्याच्या स्थितीत आल्या. मशिन गरम होऊन त्यावर ‘वॉर्मअप्’चा संदेश येत होता. यामुळे प्राध्यापकांना चांगलीच कसरत करावी लागली.
बीए अंतिम वर्षाचा इंग्रजी, प्रथम वर्षाचा मराठी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत हे ‘कम्पलसरी’ विषय, बीकॉम अंतिम वर्षाचा मराठी, हिंदी. बीसीए, एमए द्वितीयचा अर्थशास्त्र, समाजविज्ञान, इंग्रजी, बी फार्म, एम फार्म आणि एलएलबी विषयाचे पेपर मंगळवारी जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर घेण्यात आले. या केंद्रावर तब्बल ३५ हजार परीक्षार्थी होते. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसल्याने महाविद्यालयात प्रचंड तारांबळ उडाली.
विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी वर्गखोल्या अपुºया पडल्या. यामुळे महाविद्यालयातील प्रयोगशाळा कक्ष, ग्रंथालयाचा हॉल, विद्यार्थी अभ्यासगृह, महाविद्यालयातील ओट्यांवरही परीक्षार्थ्यांना बसविण्यात आले. ही परिस्थिती सांभाळताना मंगळवारी काही महाविद्यालयात परीक्षेला १५ ते २० मिनिटांचा विलंब झाला. यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला. शनिवारी जो जागेचा प्रश्न निर्माण झाला, तोच प्रश्न सोमवारी आणि मंगळवारीही कायम होता. यामुळे एका टेबलवर दोन परीक्षार्थी बसवावे लागले.
२० मेपर्यंत गर्दीचे पेपर
सर्वाधिक विद्यार्थी असणाऱ्या पेपरचे वेळापत्रक २० मेपर्यंतचे आहे. यानंतरही ७ जूनपर्यंत विविध विषयांचे पेपर विद्यापीठाला घ्यायचे आहेत. एकूणच संपूर्ण उन्हाळा महाविद्यालयांसाठी परीक्षासत्र ठरणार आहे. परीक्षा केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने हा गोंधळ उडत असून शनिवारप्रमाणे मंगळवारीही कन्ट्रोलशिटचा घोळ पाहायला मिळाला.