३५ लाखांची बॅग पळविणारा गजाआड

By Admin | Updated: February 16, 2015 01:47 IST2015-02-16T01:47:07+5:302015-02-16T01:47:07+5:30

बसमधून उतरुन हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणाऱ्या एका सेल्समनची ३५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळून जाणाऱ्या भामट्याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले.

The 35-odd bag has gone off | ३५ लाखांची बॅग पळविणारा गजाआड

३५ लाखांची बॅग पळविणारा गजाआड

पांढरकवडा : बसमधून उतरुन हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणाऱ्या एका सेल्समनची ३५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळून जाणाऱ्या भामट्याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना पांढरकवडा येथे शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. त्याचा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.
अहेतेशाम अली शाहीद अली (२५) रा. कोहिनूर सोसायटी यवतमाळ असे अटकेतील चोरट्याचे तर आमीर खान रा. पांढरकवडा असे पसार चोरट्याचे नाव आहे. यवतमाळ येथील गिरीश सुराणा यांच्या सराफा दुकानातील सेल्समन संजय भीमराव लोहकरे (३४) हे ३५ लाख रुपयांची रक्कम घेऊन शनिवारी रात्री अमरावती-हैदराबाद एसटी बसने हैदराबाद येथे जात होते. पांढरकवडा येथील एका हॉटेलजवळ रात्री १० वाजता ही बस थांबली. संजय लोहकरे बॅग घेऊन जेवणासाठी हॉटेलमध्ये जात होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. त्यावेळी संजयने जोरजोरात आरडाओरडा केला.
दरम्यान हा प्रकार एका मेटॅडोअर चालकाच्या लक्षात आला. त्यानेही वाहनासह पाठलाग सुरू केला. यावेळी चोरटे कर्मचारी वसाहतीत एका पडक्या घरात जाऊन लपले. मात्र आरडाओरडा सुरू झाल्याने वसाहतीतील नागरिक जागे झाले. त्यांनी त्या पडक्या घराला चारही बाजूने घेराव घातला. मात्र त्यातील एक चोरटा पसार झाला तर अहेतेशाम अली हा नागरिकांच्या हाती लागला. त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. तसेच ३५ लाखांची बॅगही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The 35-odd bag has gone off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.