डिक्कीतील ३५ लाखांचे सोने बचावले

By Admin | Updated: July 12, 2015 02:35 IST2015-07-12T02:35:05+5:302015-07-12T02:35:05+5:30

सराफा व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटमार करताना अ‍ॅक्टीव्हाची डिक्की उघडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने ३५ लाखांचे सोने बचावले.

35 lakhs of gold in the trunk | डिक्कीतील ३५ लाखांचे सोने बचावले

डिक्कीतील ३५ लाखांचे सोने बचावले

चार किलो चांदी लुटली : सराफांना लुटणाऱ्यांचा सुगावाच नाही, दोन दुचाकी जप्त
बाभूळगाव : सराफा व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटमार करताना अ‍ॅक्टीव्हाची डिक्की उघडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने ३५ लाखांचे सोने बचावले. मात्र चोरट्यांनी साडेचार किलो चांदी आणि गळ्यातील सोनसाखळी लंपास केली. शुक्रवारी रात्री घडलेल्या या लुटमार प्रकरणातील चोरट्यांचा अद्यापही सुगावा लागला नाही. पोलिसांनी दोन दुचाकी आणि लोखंडी रॉडसह इतर साहित्य जप्त केले. दरम्यान हल्ल्यात गंभीर जखमी सराफाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिक सुधीर रोकडे आपले दुकान बंद करून शुक्रवारी रात्री घरी जात होते. ग्रामीण रुग्णालयासमोर अंधाराचा फायदा घेत चार चोरट्यांनी अडवून त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यांच्याजवळील चांदी असलेली पिशवी आणि गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढला होता. प्रसंगावधान राखून सुधीरने आपल्या अ‍ॅक्टीव्हाची चाबी अंधारात फेकून दिली होती. त्यामुळे डिक्कीतील ३५ लाख रुपयांचे सोने बचावले. चोरट्यांनी डिक्की उघडण्याचा बराच प्रयत्न केला. त्यावेळी सुधीर यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या डोक्यावर एक चोरट्याने लोखंडी रॉडने प्रहार केला त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. सुर्दैवाने त्याच वेळी बाळू भालेराव आपल्या चारचाकी वाहनाने या परिसरातून जात होते. वाहनाच्या प्रकाशामुळे चोरटे पळून गेले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एम.एच.२७-टी-१०१८ क्रमांकाची दुचाकी जप्त केली तर दुसरी दुचाकी एम.एच-२७-वाय - १८६९ करळगाव घाटातून जप्त करण्यात आली. तसेच लोखंडी टॉमी, मिरची पावडर, दोरी, आरी, एक शर्ट, पेंचिस-पाना, आगपेटी घटनास्थळाव आढळून आले. पोलिसांनी रात्रीच श्वानपथकाला पाचारण केले होते. या चोरट्यांनी करळगाव-सुकळी-यवतमाळ रस्त्यापर्यंतचा माग दाखविला. ५० च्यावर गावकऱ्यांनी आपल्या विविध वाहनांद्वारे रात्रभर चोरट्यांचा शोध घेतला. सोबतच बाभूळगाव पोलीस, ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पहाटेपर्यत चोरट्यांचा माग काढत होते. रात्री कळंब पोलिसांनीही नाकाबंदी केली होती. (प्रतिनिधी)
लुटारूंची संख्या चार
सराफा व्यावसायिक सुधीर रोकडे यांना लुटणाऱ्या चोरट्यांची संख्या चार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील तिघे जण कमी उंचीचे तर एक जण उंच असल्याची माहिती मिळाली. सुधीर आणि उमेश रोकडे या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असून सराफा व्यावसायिकांनी आपली दुकाने शनिवारी बंद ठेवली होती. तपासासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली असून ग्रामस्थ आणि रोकडे यांची मित्रमंडळीही चोरट्यांचा शोध घेत आहे. पोलीस व राजकीय मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन पाऊले उचलावी, असे व्यापारी मंडळातर्फे प्रकाशचंद छाजेड यांनी सांगितले.

Web Title: 35 lakhs of gold in the trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.