बेंबळा एक्स्प्रेस फीडरवर 35 तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:00 AM2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:18+5:30

वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची लेव्हल मेंटन करण्यासाठी साडेचार तासांचा अवधी लागतो. अशा स्थितीत बिघाड आणि भारनियमनाचा गंभीर परिणाम होत आहे.

35 hours power outage on Bembala Express feeder | बेंबळा एक्स्प्रेस फीडरवर 35 तास वीज खंडित

बेंबळा एक्स्प्रेस फीडरवर 35 तास वीज खंडित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी प्रथमच जिल्ह्याच्या जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मात्र पाणी असले तरी वीज नसल्याने हे पाणी वेळेवर मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेंबळा प्रकल्पाच्या एक्स्प्रेस फीडरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने सुमारे ३५ तास वीज पुरवठा ठप्प झाल्याने  प्राधिकरणाची यंत्रणा गारद झाली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पुन्हा पुरवठा सुरळीत करण्यात आला.   
जिल्ह्यात सातत्याने उन्हाचा पारा ४० अंशावर असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. वीज भारनियमनाचा सर्वच घटकांवर परिणाम होताना दिसत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या स्वतंत्र वीजजोडण्या आहे. यावर मोठ्या होल्टेजचे मोटरपंप बसविलेले आहे. त्याला अखंडितपणे वीज आवश्यक आहे; परंतु विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने पाणीपुरवठ्याला त्याचा फटका बसतो आहे. 
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बेंबळा प्रकल्पावरून विशेष पाइपलाइन जोडण्यात आली आहे. यासाठी एक्स्प्रेस फीडरही आहे. ज्या ठिकाणी एक्स्प्रेस फीडर असतो तेथे विजेचा पुरवठा सेकंदासाठीही खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाते. सुरळीत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने एक्स्प्रेस फीडरकडे अत्यावश्यक बाब म्हणून  पाहिले जाते. मात्र, या ठिकाणी एक-दोन तास नव्हे तर तब्बल ३५ तास वीजपुरवठा खंडित  होता. यामुळे प्राधिकरणाचे पाण्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वीजपुरवठा सुरळीत राखणे आवश्यक आहे. दुसरीकडे दुरुस्ती कामेही तातडीने न उरकल्यास हा उन्हाळा यवतमाळकरांसाठी चिंता वाढविणारा ठरेल.

दहा मिनिट वीज गेली तर साडेचार तासांचा गॅप
- वीज जावून आल्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा असेल तरच मोटरपंप सुरू करता येतो. लाइट आल्यानंतर तत्काळ मोटरपंप सुरू करता येत नाही. पंप सुरू झाल्यानंतर प्रथम पाणी टाकीत चढवावे लागते. त्यानंतर पाणी ग्राहकांपर्यंत सोडता येते. दहा मिनिट लाइट गेली तरी टाकीची लेव्हल मेंटन करण्यासाठी साडेचार तासांचा अवधी लागतो. अशा स्थितीत बिघाड आणि भारनियमनाचा गंभीर परिणाम होत आहे.

नियमित वीजपुरवठा असेल तर चार दिवसाआड पाणी 
- भारनियमन नसेल आणि इतर कुठल्याही अडचणी नसतील तर प्रत्येक प्रभागाला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करता येतो. तसे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. मात्र वारंवार पाइपलाइन फुटणे, वीजपुरवठा खंडित होणे यासह इतर कारणांनी शहर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. त्यातही भारनियमनाचा मोठा फटका सोसावा लागत आहे.

निळाणात ६५, तर चापडोहात ५१ टक्के पाणी
- शहराला पाणीपुरवठा करणारे निळाेणा आणि चापडोह या दोन्ही प्रकल्पात यंदा चांगला जलसाठा आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात या प्रकल्पांमध्ये १५ ते २० टक्के पाणी शिल्लक राहते. यावर्षी निळोणा प्रकल्पामध्ये ६५ टक्के, तर चापडोह प्रकल्पामध्ये ५१ टक्के पाणी शिल्लक आहे. उपलब्ध जलसाठा दिवाळीपर्यंत पाणी पुरेल, असा अंदाज आहे.

भारनियमनासह वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक अडचणीमुळे फीडर बंद पडले होते. याशिवाय प्राधिकरणाची पाइपलाइनही निळोण्याच्या जवळ फुटली होती. या कारणांमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. आता वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला आहे. बेंबळाच्या एक्सप्रेस फीडरवर दुरुस्ती झाली आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. आपण स्वत: या विषयात वीज कंपनीच्या वरिष्ठांशी बोललो.
- अमोल येडगे, जिल्हाधिकारी

यवतमाळकरांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधिकरणाची यंत्रणा झटत आहे. मात्र वीज भारनियमनाने वेळापत्रक बिघडविले आहे. वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार टाकला आहे. किमान पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणी विजेचा खंड नसावा, अशी अपेक्षा आहे. तरच पाणीपुरवठा सुरळीत राहील. 
- निखिल कवठळकर, 
उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण

 

Web Title: 35 hours power outage on Bembala Express feeder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.