पिसाळलेल्या कुत्र्याचा ३२ जणांना चावा ! दिग्रसमध्ये दहशत
By अविनाश साबापुरे | Updated: June 11, 2023 15:25 IST2023-06-11T15:24:59+5:302023-06-11T15:25:19+5:30
अँटी रेबीज सिरमसाठी यवतमाळकडे धावाधाव

पिसाळलेल्या कुत्र्याचा ३२ जणांना चावा ! दिग्रसमध्ये दहशत
दिग्रस : तीन दिवसात ३२ नागरिकांना चावा घेतलेल्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची दहशत शहरात तिसऱ्या दिवशीही कायम आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेसुद्धा मुश्किल झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शहरात गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशा तीन दिवसात ३२ नागरिकांना या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. हे नागरिक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्याने हा आकडा समोर आला. अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या दिग्रसकरांत आता पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पसरली आहे. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
राजकीय नेता अन् अधिकारीही झाला शिकार
विशेष म्हणजे या कुत्र्याने एक मोठा राजकीय नेता व नगरपालिका अधिकाऱ्यांना चावा घेतला. या सर्वांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन उपचार घेतले. मात्र अँटी रेबीज सिरम हे इंजेक्शन जिल्हा ठिकाणीच उपलब्ध असल्याने या रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात जावे लागत आहे. काळ्या रंगाचे शेपूट तुटलेले हे कुत्रे सरळ अंगावर येऊन चावा घेत आहे. मागील तीन दिवसात देवनगर, शंकर टॉकीज, नगर परिषद, वाल्मिक नगर, दिनबाई शाळा परिसर, तहसील परिसर, गुरुदेवनगर या परिसरातील नागरिकांसह वाटसरूंना चावल्याची माहिती आहे. नगर पालिका प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कुत्र्याला मारण्याची परवानगी का नाही?
कुत्र्याला ठार मारण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषद गाठली. त्यावेळी आम्ही कुत्र्याचा शोध घेत आहोत. मात्र त्याचा बंदोबस्त कसा करायचा? कारण नगरपरिषदेला कुत्र्याला मारण्याची परवानगी नाही, असे सांगून नगरपरिषद प्रशासनाने आपली जबाबदारी ढकलली. वाघाला मारण्याची परवानगी मिळू शकते तर मग कुत्र्याला मारण्याची परवानगी शासन का देत नाही, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहे. जिल्हा प्रशासनाने नगरपरिषद व वनविभागाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून या कुत्र्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.