‘माणुसमाऱ्या’ पुलाने घेतला ३० वा बळी
By Admin | Updated: December 3, 2014 22:57 IST2014-12-03T22:57:32+5:302014-12-03T22:57:32+5:30
माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात

‘माणुसमाऱ्या’ पुलाने घेतला ३० वा बळी
सुनील हिरास - दिग्रस
माणूसमाऱ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या येथील धावंडा नदीवरील पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. आतापर्यंत या पुलाने ३० बळी घेतले असून पुलावर सुरक्षा कठडे मात्र लावण्यात आले नाहीत.
दिग्रस शहराच्या मध्यवस्तीतून धावंडा नदी वाहते. या नदीवर मल्लिकार्जून संस्थान आणि शनिमंदिर या दोन मंदिराच्यामध्ये एक पूल आहे. देवदर्शन सुलभ व्हावे यासाठी २३ वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली. अत्यंत वर्दळीचा हा पूल अरुंद आहे. या पुलावरून केवळ पादचाऱ्यांना जाता येते. कोणतीही दुचाकी अथवा तीनचाकी वाहन जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे या पुलाखाली अशुद्ध पाणी आणि गाळ आहे. पुलावरून पाण्यात पडलेला माणूस बाहेर येऊ शकत नाही. हा धोकादायक पूल गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच स्थितीत आहे. या पुलावरून पडून आजपर्यंत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या पुलाला दिग्रसमध्ये माणूसमाऱ्या पूल म्हणूनच ओळखले जाते. अरुणावती धरणाचे बॅक वॉटर या पुलाखाली स्थिरावले आहे. त्यामुळे येथे पाण्याची खोली वाढली आहे. तसेच शहरातील संपूर्ण सांडपाणी याच नदीत सोडण्यात येते.
मंगळवारी दुपारी तीन युवक संभाजीनगर येथे आपल्या घराकडे जात होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूल पार करताना ईश्वर दत्ता चौधरी हा या पुलावरून खाली पडला. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु ईश्वरचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी ८ वाजता ईश्वर चौधरीचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. सदर तरुणाने आत्महत्या केली की अपघात आहे, यावरून शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याच पुलावरून १२ वर्षापूर्वी उडी घेऊन ईश्वरचे वडील दत्ता टेलर यांनीही आत्महत्या केली होती.
माणूसमाऱ्या पुलाने ईश्वरचा घेतला बळी हा तिसावा आहे. यापूर्वी या पुलावरून पडून अथवा उडी घेऊन मृत्यू झाले आहे. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सोईसुविधा नाही. तसेच या पुलाची दुरुस्तीही केली जात नाही. आणखी किती बळी गेल्यावर हा पूल दुरुस्त होईल असे दिग्रसकर विचारत आहे.