१० जणांना अटक : उमरखेड शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त उमरखेड (कुपटी) : गणपती स्थापनेच्या मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची धडपकड मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत १० जणांंना अटक करण्यात आली असून शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. गणेश स्थापनेच्या दिवशी उमरखेड शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत पोलीस शिपाई गजानन शिवराम राठोड (२६) हा गंभीर जखमी झाला. त्यानेच उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून दगडफेक करणाऱ्या जवळपास ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गैर कायद्याची मंडळी जमवून दगडफेक केली. या प्रकरणी भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३६, ३२३, ३०७, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात सिकंदर खान हैदर खान, शेख नजीर शेख अहबाब, फिरोज खान ईस्माईल खान, शे.रिजवान शे. अहबाब, शरीफ खान हैदर खान, विलास कुबडे, सिद्धेश्वर तोडारे, बालाजी कऱ्हाळे, नितीन मानकर, निखिल हिंगमिरे या दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरात ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)
दगडफेक प्रकरणी ३०० जणांवर गुन्हा
By admin | Updated: September 1, 2014 00:15 IST