३० लाखांचे खत व सूक्ष्म मूलद्रव्य मोफत
By Admin | Updated: October 6, 2015 03:27 IST2015-10-06T03:27:09+5:302015-10-06T03:27:09+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा म्हणून ३० लाखांचे खत आणि सूक्ष्म मूलद्रव्याचे मोफत वितरण

३० लाखांचे खत व सूक्ष्म मूलद्रव्य मोफत
यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा म्हणून ३० लाखांचे खत आणि सूक्ष्म मूलद्रव्याचे मोफत वितरण करण्याची घोषणा जिल्हा परिषदेने केली होती. या योजनेचा एक भाग म्हणून सोमवारी यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेने सेस फंडामधून शेतकऱ्यांना ३० लाख रूपयांचा युरिया आणि सूक्ष्म मूलद्रव्य वितरित करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बोरॉन, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सफ्लेटचा समावेश आहे. यामुळे कपाशीवर लाल्या येणार नाही. शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. हे खत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तीन हजार वारसदार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. यवतमाळ खरेदी विक्री संघातून या वितरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, कृषी विकास अधिकारी जगन राठोड, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र घोंगडे, खरिदी विक्री संघाचे राजेश मॅडमवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी कापरा येथील शांताबाई तराळ, निर्मला जोगे, किन्हीच्या जुगाबाई राठोड, अरूण आंबुलकर या शेतकऱ्यांना खत आणि सूक्ष्म मूलद्रव्याचे वाटप करण्यात आले. (शहर वार्ताहर)