केळझरा येथील मेळाव्यात २९ शुभमंगल
By Admin | Updated: April 24, 2016 02:37 IST2016-04-24T02:37:00+5:302016-04-24T02:37:00+5:30
तालुक्यातील केळझरा (पो) येथे शनिवारी घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह मेळाव्यात २९ शुभमंगल पार पडले.

केळझरा येथील मेळाव्यात २९ शुभमंगल
शेतकरी पुत्रांचा पुढाकार : बळीराजा चेतना अभियानाला हातभार
आर्णी : तालुक्यातील केळझरा (पो) येथे शनिवारी घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह मेळाव्यात २९ शुभमंगल पार पडले. यात २३ हिंदू धर्मातील, तर सहा बौद्ध धर्मातील जोडप्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढाकार घेऊन बळीराजा चेतना अभियानांतर्गत हा मेळावा घेतला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या २७ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या महाकाल ग्रुपची या मेळाव्यासाठी मोठी मदत लाभली. त्यांच्यातर्फे सर्व जोडप्यांना घड्याळ स्वरूपात भेटवस्तू देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम, मीनाक्षी विलास राऊत, आर्णी पंचायत समिती सभापती सुनीता रोहिदास राठोड, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, राजेंद्र शिवरामवार, मनसेचे सचिन येलगंदेवार, संदीप बुटले, फैयाज सैयद, संजय बोरकर, केळझराच्या सरपंच विशाखा कांबळे, पोलीस पाटील वैभव कोट्टावार, सचिव ए.एस. राठोड, चंदू राठोड, आकाश राठोड, अभिलाष इंगोले आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. शेतकऱ्यांच्या मुलांनी घेतलेल्या या मेळाव्याचे कौतुक करण्यात आले. या संदर्भात आकाश चंदू राठोड म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना आधार देण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत सामूहिक विवाह मेळावा आयोजित करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आपला प्रयत्न होता. यासाठी गावकऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा हातभार लाभला.
महाकाल ग्रुपचे अभिलाष इंगोले म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आम्ही २७ तरुणांनी हा ग्रुप बनविला आहे. शेतकऱ्याच्या मुलाने आयोजित केलेल्या मेळाव्यास मदत करण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला. (शहर प्रतिनिधी)