२८१ कोटी कर्जाची परतफेड

By Admin | Updated: April 18, 2015 02:07 IST2015-04-18T02:07:32+5:302015-04-18T02:07:32+5:30

शेतकरी सतत दुष्काळ व नापिकीचा सामना करीत असल्याने आर्थिक संकटात सापडला आहे.

281 crore loan repayment | २८१ कोटी कर्जाची परतफेड

२८१ कोटी कर्जाची परतफेड


यवतमाळ : शेतकरी सतत दुष्काळ व नापिकीचा सामना करीत असल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २८१ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली झाली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून कर्जाची सक्तीने वसुली केली जाऊ नये, त्यांना थकीत कर्जाचे पुढील तीन वर्षांसाठी हप्ते पाडून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक अंमलबजावणीही करीत आहे. त्याच वेळी बँकेने सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन बँकेच्या कर्ज वसुलीवर भर कायम ठेवला आहे. बँकेची यंत्रणा शेतकऱ्याच्या भेटी-गाठी घेऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करताना दिसत आहेत. शासनाच्या आदेशानुसार बँक कर्जाचे हप्ते पाडून देण्यास तयार असले तरी यामुळे शेतकऱ्याचे कसे नुकसान होते, त्याच्यावर व्याज व कर्जाचा कसा बोझा बसतो, हे पटवून दिले जात आहे. कर्जाचे हप्ते पाडणे म्हणजे आजचे संकट उद्यावर लोटण्याचा प्रकार असल्याचेही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले जात आहे. ही बाब पटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची वेळीच परतफेड करून शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. त्यातूनच बँकेच्या तब्बल २८१ कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने परतफेड केली आहे. आजही जिल्हा बँकेत दररोज ७० ते ८० लाख रुपयांच्या कर्जाची वसुली होते आहे.
गेल्या वर्षी बँकेने ३५८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले होते. यातील आतापर्यंत २६१ कोटी रुपये वसूल झाले आहे. आणखी ८० ते ९० कोटींची वसुली पुढील तीन महिन्यात होण्याची अपेक्षा बँक व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. कारण शेतकऱ्यांच्या कर्ज परतफेडीला जूनपर्यंत तीन महिन्याची मुदत वाढवून दिली गेली आहे. वास्तविक बँकेला ९०० कोटी रुपयांच्या कर्ज परतफेडीची अपेक्षा आहे. यातील ३५८ कोटी पीक कर्जाचे आहे. तर ४२३ कोटी रुपयांची रक्कम गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे. या थकीत रकमेपैकी केवळ २० कोटी रुपये यावर्षी वसूल झाले आहे. त्यात अनेक मुदती कर्जांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 281 crore loan repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.