२७ लाख नागरिक ‘आधार’च्या कक्षेत
By Admin | Updated: May 16, 2017 01:28 IST2017-05-16T01:28:10+5:302017-05-16T01:28:10+5:30
शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे.

२७ लाख नागरिक ‘आधार’च्या कक्षेत
आॅनलाईन मदत : जिल्ह्यातील कार्यरत केंद्रांची यादी संकेतस्थळावर, आणखी दोन लाख नागरिकांना हवा आधार
सुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाच्या विविध योजना व इतर सर्व महत्वपूर्ण कामांसाठी ‘आधार’ कार्ड आता अनिवार्य झाले आहे. ते पाहता जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आधार नोंदणीची मोहीम जोरात राबविण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यातील २७ लाख नागरिक आधार च्या कक्षेत आले असून मे २०१७ पर्यंत या आकड्यात आणखी भर पडली आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली स्वतंत्र ओळख (युआयडी) निर्माण करण्यासाठी आधार नोंदणी करण्याची मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. आधार कार्ड हे शासनाच्या सर्व योजना व बँकींग कामांसाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात २७ लाख म्हणजे ९२ टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. तर उर्वरित दोन लाख २४ हजार नागरिकांची आधार नोंदणी करण्यासाठी १८० केंद्र तालुका व गावस्तरावर कार्यरत असल्याचा शासनाचा दावा आहे.
या सर्व केंद्रांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील काही केंद्र तहसील कार्यालयात कायमस्वरुपी लावण्यात सुरू आहेत. आधार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधार कार्डपासून वंचित असलेल्यांनी लाभ घेऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
आधार मदत केंद्र
नागरिकांच्या आधार कार्ड विषयी विविध अडचणी लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मदत केंद्र उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या आधार कार्ड विषयी कोणत्याही अडचणी असल्यास ते ९४०५४२२२०० या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस्अॅप किंवा एसएमएस द्वारा इमेज व संदेश पाठवू शकतील. संदेश पाठविताना आधार नोंदणी पावतीचा २८ आकडी क्रमांक किंवा पावती स्कॅन करून पाठवू शकता. आधार नोंदणी करताना दिलेल्या रजिस्टर नोंदणी मोबाईल वरूनच संदेश पाठवायचा आहे. इतर मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठविताना कोणतेही एक ओळखपत्र स्कॅन करून पाठवावे. ज्यांच्याकडे आधार नोंदणी पावती आहे, परंतु त्यांना अद्याप आधार कार्ड मिळाले नाही, अशा नागरिकांनी या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे. परंतु या क्रमांकावर फोन करता येणार नाही, तसेच इतर कोणतीही इमेज पाठवू नये. ही सेवा केवळ यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठीच आहे.
‘आधार’कार्ड काढण्याचा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. ९३ टक्केहून अधिक नोंदणी झाली आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागात आम्ही स्वत: जाऊन जे नागरिक अद्यापही आधार पासून वंचित आहे, त्यांची नोंदणी करीत आहो. त्यासाठी पोलीस पाटील व इतर नागरिकांचे सहकार्य घेत आहो. आवश्यक ते प्रमाणपत्र जाग्यावर उपलब्ध करून देत आहो.
- सचिन शेजाळ,
तहसीलदार, यवतमाळ .