जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनासाठी आले २७ कोटी
By Admin | Updated: December 20, 2014 02:12 IST2014-12-20T02:12:34+5:302014-12-20T02:12:34+5:30
सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी सूक्ष्म सिंचनावर भर दिला जात आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनासाठी आले २७ कोटी
यवतमाळ : सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी सूक्ष्म सिंचनावर भर दिला जात आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. सूक्ष्म सिंचनासाठी २७ कोटी रूपयांचे प्रस्ताव कृषी विभागापुढे आले आहेत. सर्वाधिक मागणी तुषार संचांची आहे. यासाठी १९ कोटींची तरतुद करण्यात आली होती. मात्र अतिरीक्त आठ कोटी रूपयांचा निधी जिल्ह्याला लागणार होता. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला आहे.
जिल्ह्यात पॅकेजसह धडक सिंचन विहिरींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दिवसेंदिवस सिंचन विहीरीच्या संख्येत वाढ होत आहे. विहिरींच्या उपलब्ध पाणी साठ्यातून अधिकाधिक क्षेत्र ओलीत करता यावे यासाठी सूक्ष्म सिंचनाचा पर्याय लोकप्रिय ठरला आहे. यामध्ये ठिबक संचापेक्षा तुषार संचाला सर्वाधिक पसंती आहे.
या संचासाठी कमी पैसे मोजावे लागतात. यामुळे शेतकऱ्यांची धाव तुषार संच खरेदीकडे आहे. जिल्ह्यातील १० हजार ८०७ शेतकऱ्यांनी नऊ हजार ८५२ हेक्टरच्या ओलीतासाठी संच बसविले. १४ कोटी ७४ लाख ९ हजार रूपयाचे अनुदान या संचाकरीता मंजूर करण्यात आले आहे. ७६० लाभार्थ्यांनी ९६८.९ हेक्टरवर ठिबक संच बसविला. यासाठी ७५ टक्के अनुदान मंजूर करण्यात आले. यातून शेतकऱ्यांना ठिबक संच बसविण्यासाठी चार कोटी ५१ लाख ९५ हजार रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तुषार आणि ठिबक संच बसविण्यासाठी २७ कोटी ४६ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. यापैकी १९ कोटी रूपयांचे अनुदान कृषी विभागाने शेतकऱ्यांन वितरीत केले. तर आणखी आठ कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला लागणार होता. तोही निधी आता प्राप्त झाला आहे. यामुळे जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. (शहर वार्ताहर)