रिअल इस्टेटमध्ये २६ लाखांनी गंडा
By Admin | Updated: June 24, 2015 00:07 IST2015-06-24T00:07:55+5:302015-06-24T00:07:55+5:30
बोगस सातबाराच्या आधारे अमरावतीच्या व्यापाऱ्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

रिअल इस्टेटमध्ये २६ लाखांनी गंडा
अमरावतीचा व्यापारी : नेर येथील युवकास अटक, सातबारा बोगस
नेर : बोगस सातबाराच्या आधारे अमरावतीच्या व्यापाऱ्याची २६ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी येथील अशोक रामदास वयले (३५) याला अमरावती पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
अमरावती येथील रतनलाल कन्हैयालाल भुतडा (६७) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी अशोक रामदास वयले (नेर), प्रकाश वामन वानखडे (नागपूर), नारायण अमृत अडेकर (अमरावती) यांच्याशी त्यांनी दाखविलेल्या सातबाराच्या आधारावर शेती आणि प्लॉटचा सौदा केला. इसारापोटी २६ लाख रुपयांचा धनादेश देवून नोटरी करून घेतली.
त्याच दिवशी खरेदीची तारीख ठरविण्यात आली. मात्र सदर तिघेही यादिवशी हजर झाले नाही.
दरम्यान, रतनलाल भुतडा यांनी सातबाराची शहानिशा केली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सदर तिघांनी दाखविलेल्या सातबारावरील शेत आणि प्लॉट बुलडाणा अर्बनकडे तारण असल्याचे स्पष्ट झाले. भुतडा यांनी अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात १० मे रोजी तक्रार नोंदविली. या ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, मुरलीधर डोईजड, यादव यांनी मंगळवारी अशोक वयले याला त्याच्या कृषी केंद्रातून अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही अशोक वयले याला बुलडाणा अर्बन सोसायटीत खोटे दस्तावेज प्रकरण आणि कृषी विभागाच्या स्प्रिंकलरप्रकरणी फसवणुकीच्या आरोपात अटक झाली होती. (तालुका प्रतिनिधी)
बुलडाणा अर्बनकडे मालमत्ता तारण
गट क्र.२३७ मधील दोन हेक्टर २१ आर पिंपरी कलगा शिवारातील शेत. गट क्र. २७४ मधील दोन हेक्टर आणि गट क्र. २७२ मधील एक हेक्टर ४० आर शेत. किरणनगरमधील सहा हजार चौरस फूट प्लॉट. ही सर्व मालमत्ता बुलडाणा अर्बन सोसायटीकडे तारण आहे.