जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत ‘मेडिकल’चे २६ डॉक्टर गैरहजर
By Admin | Updated: June 28, 2015 00:06 IST2015-06-28T00:06:10+5:302015-06-28T00:06:10+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार शनिवारी खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी अनुभवला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत ‘मेडिकल’चे २६ डॉक्टर गैरहजर
रुग्णांचे बयाण : एक दिवसाचे वेतन कापण्याचे निर्देश
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार शनिवारी खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी अनुभवला. दोन तास रुग्णालयात थांबल्यानंतरही तब्बल २६ डॉक्टर गैरहजर आढळून आले. गैरहजर डॉक्टरांचा अहवाल सादर करून त्यांचे वेतन कापण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. तसेच अस्वच्छतेबाबतही प्रचंड नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अकस्मात भेटीने ‘मेडिकल’ वर्तुळात एकाच खळबळ उडाली.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल रुग्णांच्या नेहमीच तक्रारी असतात. डॉक्टर वेळेवर उपस्थित रहात नसल्याचेही अनेकदा दिसून येते. वरिष्ठांकडे तक्रार करूनही कोणतीही सुधारणा होत नाही. मात्र आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारात लक्ष घातले. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांनी आपला मोर्चा ‘मेडिकल’कडे वळविला. त्याठिकाणी फेरफटका मारला असता, मेडिकलचा गलथानपणा पुढे आला. वैद्यकीय महाविद्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रचंड संतापल्याची माहिती आहे.
गैरहजर डॉक्टरांमध्ये मेडिसीन, सर्जरी, अस्थिव्यंग उपचार, नेत्र, क्ष-किरण, बालरोग, नाक-कान-घसा, विकृतीशास्त्र, रक्तपेढी, दंत, मानोसपचार, टीबी व छाती या विभागांचे प्रमुख, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्यातांचा समावेश आहे. तसेच बोटावर मोजण्याइतकेच निवासी डॉक्टर आढळून आले. बाह्यरुग्ण विभागासमोरील रुग्णांची गर्दी पाहून त्यांचे बयान नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावरून लोहारा, येळाबारा, सावरगड, बारडतांडा, पिंपरी, पांढुर्णा, इचोरा, गोरेगाव, हुसनापूर येथील रुग्णांचे बयान नोंदविले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली असता डॉक्टरांची वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परिचारिकांची बैठक घेऊन रुग्णांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला. कुठल्याही रुग्णाला उद्धट वागणूक दिली जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचविले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छतेची पाहणी केली. साफसफाईचे काम सकाळी ८ वाजेपूर्वी करण्याची सूचना सफाई कामगारांना केली.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या महाविद्यालयात बैठक घेतली होती. त्यावेळी कामकाज सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचे वास्तव शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनीच अनुभवले.
सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अद्यावत सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. सीटी स्कॅन मशीनद्वारे होणाऱ्या तपासण्या महागड्या असून त्या तपासण्याबाहेर न करता वैद्यकीय महाविद्यालयातच कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले. (शहर वार्ताहर)
कारवाई होणार दोन दिवसानंतर
वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड हे शासकीय कामकाजासाठी मुंबई येथे गेले आहेत. त्यांचा प्रभार डॉ. बाळकृष्ण बांगडे यांच्याकडे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ. राठोड रुजू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बाह्य रुग्ण तपासणी विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ इतकी आहे. मात्र बहुतांश डॉक्टर नऊच्या पुढेच येतात. शनिवारी सकाळी केवळ काही निवासी वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. बांगडे यांनी सांगितले. वेतन कापण्याची कारवाई करण्याबाबत निर्णय डॉ. अशोक राठोड आल्यानंतरच घेतला जाईल, असेही बांगडे यांनी सांगितले.