प्रकल्पग्रस्तांना मिळणार २५ कोटींचा मोबदला
By Admin | Updated: November 8, 2015 02:24 IST2015-11-08T02:24:50+5:302015-11-08T02:24:50+5:30
वेकोलिच्या वणी नार्थ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चार वर्षानंतर अखेर न्याय मिळाला.

प्रकल्पग्रस्तांना मिळणार २५ कोटींचा मोबदला
वणी : वेकोलिच्या वणी नार्थ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चार वर्षानंतर अखेर न्याय मिळाला. वेकोलिने संपादीत केलेल्या शेतीचा शेतकऱ्यांना २५ पट मोबदला मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी मालामाल होणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
वेकोलिने जुनाड खाणीसाठी २०११ मध्ये जुनाड, पिंपळगाव व बोरगाव येथील शेतकऱ्यांची ३२० एकर शेती संपादित केली. त्यावेळच्या ब्रिटीशकालीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना वेकोलिकडून केवळ ३५ हजार रूपये प्रति एकर दराने मोबदला देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासाठी वेकोलिकडून टाळाटाळ झाली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी तत्कालीन खासदार हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली. अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथांना प्राधान्य देऊन वेकोलि प्रशासनाशी संघर्ष केला. त्यामुळे वेकोलिने अखेर ९४ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले व जमीन अधिग्राणाचा कायदा बदलून प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला सन्मानजनक मोबदला देण्याचे मान्य केले. आता शेतकऱ्यांना आठ ते नऊ लाख रूपये प्रति एकर दराने मोबदला मिळणार आहे. या वाढीव दराच्या फरकाचे २५ कोटी रूपयांचे वितरण वेकोलितर्फे रविवारी केले जाणार आहे. यासाठी भालर, जुनाड रोडवरील वेल्हाळा मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वेकोलिचे सहप्रबंधक राजीव रंजन मिश्र, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वेकोलिचे तांत्रिक निदेशक एस.एस.मल्ही व कार्मिक निदेशक डॉ.संजयकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यमंत्री अहीर यांच्याहस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र डांगे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, वैदेही नायगावकर, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, रवी बेलूरकर, उमा पिदूरकर व वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक डी.एम.गोखले यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)