२० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By Admin | Updated: November 23, 2014 23:27 IST2014-11-23T23:27:17+5:302014-11-23T23:27:17+5:30
आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे विमा संरक्षण देणारी योजना ठरली आहे. योजनेंतर्गत लाभधारक नागरिकांना विम्याचे कवच देण्यासोबतच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचाही

२० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
आम आदमी विमा योजना : १ कोटी १९ लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण
यवतमाळ : आम आदमी विमा योजना सर्वसामान्य नागरीकांना हक्काचे विमा संरक्षण देणारी योजना ठरली आहे. योजनेंतर्गत लाभधारक नागरिकांना विम्याचे कवच देण्यासोबतच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचाही लाभ मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अशा लाभधारकांच्या तब्बल २० हजारावर मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची ही रक्कम १ कोटी १९ लाख इतकी होती.
आम आदमी विमा योजना ही अतिशय महत्वाकांशी योजना आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येते. आर्थिक दुर्बलांना आधार देण्यासाठी ही विमा योजना असून महसूल विभागाच्यावतीने योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. तालुकास्तरावर पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे विमा अर्ज एलआयसीकडे भरल्या जात आहे. या योजनेसाठी कोणत्याही प्रवगार्तील लाभार्थी पात्र असून लाभार्थ्यांचे वय १८ ते ५९ वर्ष वयोगटातील तसेच लाभार्थी भूमिहीन किंवा पाच एकर पेक्षा कमी जमीन धारण करणारा शेतकरी असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत जवजवळ दोन लाखांवर नागरिकांनी आपला विमा उतरविला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या पाल्यांना योजनेंतर्गत शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. एका विमाधारक व्यक्तीच्या दोन पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. योजनेच्या पहिल्या वर्षी सन २००९-१० मध्ये केवळ ६ विद्यार्थ्यांना ४ हजार ८०० इतक्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. सन २०११-१२ मध्ये ७३ विद्यार्थ्यांना ४ लाख ३८ हजार रुपये शिष्यवृत्तीच्या रुपात देण्यात आले.
यानंतर सातत्याने या योजनेचे लाभधारक वाढल्याने व या लाभधारकांच्या पाल्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर शिष्यवृत्ती देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याने सन २०१२-१३ मध्ये शिष्यवृत्तीचा आकडा ३४ लाख ३९ हजारावर पोहचला होता. यावर्षी जिल्ह्यातील ५७३३ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली होती. गेल्यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्तीची मोहीम राबविण्याने १३ हजार १३२ विद्यार्थ्यांना ७९ लक्ष रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २० हजार ७० विद्यार्थ्यांना शिष्यृत्ती वितरीत करण्यात आली असून शिष्यवृत्तीची रक्कम १ कोटी १९ लाख इतकरी आहे. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९३१ विद्यार्थ्यांच्या याद्या प्राप्त होत असून या विद्यार्थ्यांना आणखी ५ लाख ५८ हजार इतकी शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. आम आदमी विमा योजनेंतर्गत प्रति विद्यार्थी प्रति माह शंभर रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांस अन्य कोणत्याही योजनेतून शिष्यवृत्ती दिली जात असली तरीही आम आदमी विमा योजनेंतर्गत सदर विद्यार्थी पात्र ठरत असल्यास ही शिष्यवृत्ती दिली जाते. आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी असलेल्या नागरिकांनी या शिष्यवृत्तीसाठी आपल्या पाल्यांचे अर्ज संबंधित शाळेमार्फत भरुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)