ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे
By Admin | Updated: August 29, 2015 02:43 IST2015-08-29T02:43:57+5:302015-08-29T02:43:57+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत उमरखेड तालुक्यात ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे होत असल्याचे पुढे आले आहे.

ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे
अविनाश खंदारे उमरखेड
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत उमरखेड तालुक्यात ई-निविदा न काढताच २० कोटींची कामे होत असल्याचे पुढे आले आहे. शाखा अभियंत्यांचेही संगनमत असून ग्रामसेवकांच्या निष्क्रीयतेमुळे कामे निकृष्ट होत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कामे असेल तर त्यासाठी ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर करणे बंधनकारक आहे. ई-निविदा न काढणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे निर्देश आहे. असे असतानाही उमरखेड तालुक्यातील दलित वस्ती, तांडा सुधार वस्ती, ठक्कर बाप्पा योजना, आमदार विकास निधी, खासदार निधी, बीआरजीएफ १३ वा वित्त आयोग, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्तीचे कामे अशा शासनाच्या विकासात्मक कामासाठी तीन लाख रुपयांच्यावर रकमेची कामे पार पडली. परंतु या कामाची कुठलीही ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही.
उमरखेड तालुक्यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या विकास कामाकरिता ग्रामपंचायतीला निधी दिला जातो.
शासकीय नियमानुसार आलेल्या निधीचा ई-निविदा प्रणालीचा वापर करून ग्रामसेवकाने प्रक्रिया पार पाडली पाहिजे. परंतु संबंधित यंत्रणेच्या शाखा अभियंत्यांला हाताशी धरुन ई-निविदा न काढता तीन लाखांच्या वरची कामे ग्रामसेवकांनी केली आहे. ई-निविदा न करता १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ग्रामपंचायत विकास काम करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याचा करारनामा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामध्ये केला जातो. वास्तविक पाहता तालुक्यातील एकही ग्रामपंचयात आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही. कारण कोणत्याही ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात दहा हजाराच्यावर रक्कम दिसून येत नाही. मग ही लाखो रुपयांची कामे ग्रामसेवक कशी पार पाडतात या बाबीची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गत वर्षी ई-निविदा न काढता काम पार पडलेल्या कामामध्ये नागापूर, ढाणकी, पोफाळी, तिवरंग, बेलखेड, वाणेगाव, लोहरा, खरुस, देवसरी, दिघडी, बोरी, ब्राम्हणगाव, गाजेगाव, बिटरगाव, जेवली, सोनदाबी, कुरळी, बोथा, डोंगरगाव, पिरंजी, बाळदी, मार्लेगाव, अंबाडी, नागेशवाडी, सुकळी, चिल्ली, दराटी, मुरली, मोहदरी, डोंगरगाव यासह मुळावा येथील कामांचा समावेश आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते, वॉलकंपाऊंड, सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. ही कामे ई-निविदा न काढता ग्रामसेवक व शाखा अभियंत्याने परस्पर पार पाडली आहे. तसेच या कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते.