उमरखेड तालुक्यात होणार २० कोटींचे वन उद्यान
By Admin | Updated: May 1, 2015 02:04 IST2015-05-01T02:04:05+5:302015-05-01T02:04:05+5:30
शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वन उद्यान निर्माण करण्याची योजना कार्यान्वित केलीे.

उमरखेड तालुक्यात होणार २० कोटींचे वन उद्यान
उमरखेड : शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वन उद्यान निर्माण करण्याची योजना कार्यान्वित केलीे. दिवंगत उत्तमराव पाटील यांच्या नावाने असलेल्या या योजनेची घोषणा अधिवेशन काळात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत उमरखेड शहराला लागून असलेल्या अंबोना तलाव परिसरात वनविभागाच्या जागेवर हे उद्यान होणार आहे. यासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
वन व वनेत्तर जमिनीवरील जैव विविधता व निसर्ग संरक्षण या माध्यमातून प्रस्थापित करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी आमदार राजेंद्र नजरधने, वनविभागाचे अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नियोजित उद्यान स्थळाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने यांनी यासंदर्भातील माहिती पत्रकारांना दिली. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये शासनाची पडिक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशा जमिनीचे सौंदर्यीकरण करून विकास करणे हे या योजनेत अभिप्रेत आहे. यामध्ये शहरालगत असलेल्या जमिनीवर वृक्ष लागवड करणे, उद्यान निर्मिती करणे, लहान मुलांना मनोरंजन व खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही विकासाची कामे करताना पाणीपुरवठा, विजेची उपलब्धता, संरक्षण आदी सुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या उद्यानामध्ये विविध प्रकारचे वृक्ष, विविध ऋतुंमध्ये बहरणारी फुलझाडे, सावली देणाऱ्या प्रजातींची लागवण करणे, मुलांसाठी उद्यानामध्ये खेळणी बसविणे, कारंजे बसविणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी पायवाट (जॉगिंग पार्क) तयार करणे या सर्व बाबी येथे पर्यावरणाचा समतोल कायम राखून तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात २२ एप्रिल रोजी राज्याचे वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी वनविभागाला दिले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराला लागून असलेल्या अंबोना तलावाशेजारी वनविभागाच्या जमिनीवर ही योजना पूर्ण केली जात असून त्यासाठी २० कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. अंबोना तलावावर जावून आमदार राजेंद्र नजरधने, सामाजिक वनविभाग अमरावतीचे उपसंचालक व्ही.व्ही. घाटे यांनी संबंधितांना काही सूचना केल्या. (शहर प्रतिनिधी)