रमाई आवास योजनेचे दोन कोटी वाटप
By Admin | Updated: June 26, 2015 02:22 IST2015-06-26T02:22:30+5:302015-06-26T02:22:30+5:30
रमाई आवास योजनेंतर्गत आर्णी नगरपरिषदेला ५.५ कोटी रुपये आतापर्यंत प्राप्त झाले.

रमाई आवास योजनेचे दोन कोटी वाटप
आर्णी : रमाई आवास योजनेंतर्गत आर्णी नगरपरिषदेला ५.५ कोटी रुपये आतापर्यंत प्राप्त झाले. २५४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रतिलाभार्थी दीड लाखांप्रमाणे ३३७ लाभार्थ्यांसाठी या योजनेतून अनुदान मंजूर करण्यात आले. आतापर्यंत दोन कोटी दहा लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले आहे.
आर्णी शहर, मनपूर, देऊरवाडी (पु), कोळवन, दत्तरामपूर भागातील दारिद्र्यरेषेखालील १०० टक्के पात्र लाभार्थ्यांसह दारिद्र्यरेषेवरील काही लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. पूर्णत: बीपीएल लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर एपीएलचे अर्ज मागविण्यात आले.
घरकूल बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्या टप्प्याने निधी वितरित करण्यात येते. ८१ लोकांनी आपले बांधकाम पूर्ण केले असून नगरपरिषदेकडून त्यांना दहा हजारांचा अंतिम हप्ता वितरित करण्यात आला आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेला विलंब केल्याने २५ लोकांना २५ हजारांचा पहिला हप्ता वितरित करावयाचा आहे. उल्लेखनीय म्हणजे, १९ लाभार्थ्यांनी निधी प्राप्त असूनही अद्याप बांधकामाला सुरुवातही केलेली नाही. इतर लाभार्थ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून आवश्यकतेप्रमाणे निधीचे वितरण करण्यात येत आहे.
या योजनेच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी, नगरसेवक व कर्मचारी परिश्रम घेत असून लाभार्थ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आरिज बेग यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)