अवैध सावकारीच्या १८९ तक्रारी दाखल
By Admin | Updated: November 2, 2016 00:50 IST2016-11-02T00:50:03+5:302016-11-02T00:50:03+5:30
सावकारग्रस्त नागरिकांनी सावकाराविरोधात दंड थोपटले असून जिल्ह्यातून १८९ तक्रारी पुढे आल्या आहेत.

अवैध सावकारीच्या १८९ तक्रारी दाखल
पाच प्रकरणांत गुन्हा : ६७ प्रकरणांची चौकशी सुरू
यवतमाळ : सावकारग्रस्त नागरिकांनी सावकाराविरोधात दंड थोपटले असून जिल्ह्यातून १८९ तक्रारी पुढे आल्या आहेत. यातील पाच प्रकरणात सहकार विभागाने गुन्हे नोंदविले आहेत. तर ६७ प्रकरणात चौकशी सुरू आहे.
आघाडी सरकारच्या कार्यकाळात अवैध सावकारांना वठणीवर आणण्यासाठी कोपरापासून ढोपरापर्यंत सोेलून काढण्याची भूमिका राज्य शासनाने व्यक्त केली. यामुळे अवैध सावकाराविरोधातील मोहीम अधिकच वेगवान झाली होती. नंतरच्या काळात ही मोहीम थंडावली. आता अवैध सावकारी विरोधातील मोहिमेला आणखी गती आली आहे.
सहकार विभागाकडे अवैध सावकारी विरोधातील तक्रारी दिवसेन्दिवस वाढत आहेत. सप्टेंबर २०१६ पर्यंत सहकार विभागाकडे १८९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३९ तक्रारी यवतमाळ तालुक्यातील आहेत. आर्णी तालुक्यातून १९ तक्रारी आल्या आहेत. उमरखेड ६, कळंब ११, घाटंजी ६, झरी २, दारव्हा २२, दिग्रस ७, नेर ८, पांढरकवडा ८, पुसद १५, बाभूळगाव २, महागाव १६, मारेगाव ६, राळेगाव ४, वणी १८ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पाच प्रकरणात फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या. तर ६७ प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आर्णी ४, कळंब १, घाटंजी १, झरी १, दिग्रस २, नेर २, पांढरकवडा ४, पुसद ३, बाभुळगाव १, महागाव १४, मारेगाव २, यवतमाळ २४, राळेगाव १ आणि वणीत ७ प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सहकार विभागाने अवैध सावकारी विरोधात मोहीम हाती घेतली आहे. तक्रारीवरून धाडी घालण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हे दाखल होण्याच्या प्रक्रियेने अनेकांनी आता सावकारीच बंद केली आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यातून आलेल्या तक्रारीनुसार सहकार विभागाने अवैध सावकारी विरोधात मोहीम हाती घेतली आहे. अवैध सावकारांना कुठेही थारा नसावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- गौतम वर्धन, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग