अध्यक्षांसाठी १७ लाखांची इनोव्हा
By Admin | Updated: August 5, 2014 23:35 IST2014-08-05T23:35:06+5:302014-08-05T23:35:06+5:30
संचालक मंडळ आणि सहकार प्रशासनाला अंधारात ठेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसाठी १७ लाख रुपयांची नवी कोरी इनोव्हा गाडी खरेदी करण्यात आली आहे.

अध्यक्षांसाठी १७ लाखांची इनोव्हा
जिल्हा बँक : विनापरवाना खरेदी, संचालक मंडळही अनभिज्ञ
यवतमाळ : संचालक मंडळ आणि सहकार प्रशासनाला अंधारात ठेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसाठी १७ लाख रुपयांची नवी कोरी इनोव्हा गाडी खरेदी करण्यात आली आहे. विनापरवाना झालेल्या या व्यवहारात सहकार प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यास बँकेचे संचालक मंडळ अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहेत, दुबार पेरणी बुडली आहे, तिबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसा नाही, बँक कर्ज देण्यास तयार नाही, बँकेची नव्या सभासदांना कर्ज देण्याची तयारी नाही, त्यासाठी कर्जाची वसुली न होणे, राज्य बँकेकडून कर्ज न मिळणे, पुरेसा पैसा उपलब्ध नसणे, अशी कारणे सांगितली जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या बँकेत शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेऊन चैनीच्या वस्तूंवर उधळपट्टी केली जात आहे. बँकेच्या अध्यक्षांसाठी नुकतीच खरेदी करण्यात आलेली १७ लाखांची इनोव्हा गाडी या उधळपट्टीचाच एक भाग ठरली आहे. यापूर्वी अध्यक्षांसाठी अशाच पद्धतीने उधळपट्टी करताना तब्बल ४८ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करण्यात आला होता.
इनोव्हा गाडीची खरेदी करताना बँकेच्या संचालक मंडळाला विश्वासात घेतले गेले नाही, संचालकांच्या बैठकीत असा कोणताही प्रस्ताव ठेवला गेला नाही. १७ लाखांच्या या इनोव्हा खरेदीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे अनेक संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले. एवढेच नव्हे तर सहकार प्रशासनालाही या खरेदीची पूर्व कल्पना नाही. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुका होईल. अवघे काही महिने शिल्लक राहिल्याचे पाहूनकाही संचालक बँकेतून मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करीत असल्याचे दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)