महिनाभरात १६५० ग्राहकांची वीज तोडली

By Admin | Updated: November 12, 2016 01:43 IST2016-11-12T01:43:59+5:302016-11-12T01:43:59+5:30

महावितरणकडून जिल्ह्यात सध्या वीज बिल वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे.

1650 customers lost their power during the month | महिनाभरात १६५० ग्राहकांची वीज तोडली

महिनाभरात १६५० ग्राहकांची वीज तोडली

महावितरणची धडक मोहीम : १ लाख ८३ हजार ग्राहकांकडे चालू बिलाची थकबाकी
यवतमाळ : महावितरणकडून जिल्ह्यात सध्या वीज बिल वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत एका महिन्यात १६५० थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक प्रकारातील चालू बिलाची थकबाकी असणारे तब्बल १ लाख ८३ हजार ८२८ ग्राहक आहे. या ग्राहकांकडे एकूण ३७ कोटी ३२ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांना वारंवार नोटीस बजावूनसुद्धा यांनी वीज बिलाचा भरणा केला नसल्याने वीज कंपनीने वसुलीसाठी एक महिन्यापासून धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत ३३ हजार ८३१ वीज ग्राहकांनी ७ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये वीज बिलाचा भरणा करून पुढील कारवाई टाळली आहे. यादरम्यान मोहिमेला प्रतिसाद न देणाऱ्या १६५० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्यात आला आहे. सहा महिन्यात त्यांनी आपल्याकडील देयकाचा भरणा न केल्यास तो कायमस्वरुपीसुद्धा खंडीत केला जाऊ शकतो. याच मोहिमेदरम्यान ३२३ ग्राहकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महावितरणचे यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद असे तीन विभाग आहे. चालू बिलाच्या थकबाकीवर विभागवार नजर टाकल्यास यवतमाळ विभागात ७१ हजार ५२३ थकबाकीदार ग्राहक असून यांच्याकडे १५ कोटी ४६ लाख ३३ हजार रुपये आहेत. यातील २४ हजार २७ ग्राहकांनी गेल्या एक महिन्यात ५ कोटी ४४ लाख ६५ हजार रुपये भरले. ९३५ ग्राहकांना तात्पुरता तर ३७ ग्राहकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडी करण्यात आला आहे.
पांढरकवडा विभागातील ४६ हजार ५८ ग्राहकांकडे ९ कोटी ६२ लाख रुपये थकबाकी आहे. यातील ५ हजार ७३६ ग्राहकांनी १ कोटी ३० लाख रुपये भरले. ३३२ ग्राहकांचा तात्पुरता तर २४६ ग्राहकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या २४६ ग्राहकांकडे १४ लाख ८७ हजार रुपये थकबाकी आहे.
पुसद विभागात ६६ हजार २४७ थकबाकीदार वीज ग्राहकांकडे १२ कोटी २४ लाख १८ हजार रुपये थकबाकी आहेत. यातील चार हजार ६८ ग्राहकांनी ६४ लाख रुपये भरले. ३८३ वीज ग्राहकांचा तात्पुरता वीज पुरवठा तर ४० लोकांचा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
वीज कंपनीकडून वर्षभर वसुलीसाठी धडक मोहीम राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे ही आकडेवारी चालू बिलाबाबत आणि केवळ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदार ग्राहकांचीच आहे. यामध्ये कामयस्वरुपी खंडीत असलेल्या वीज ग्राहकांचा तसेच कृषी आणि अभय योजनेतील वीज ग्राहकांचा समावेश नाही. ही सर्व थकबाकी पाहल्यास हा आकडा आणखी कितीतरी मोठा होईल. सध्या महावितरणच्या धडक वसुली मोहिमेचा अनेकांनी धसका घेतला असून देयकाचा भरणा करून पुढील कारवाई टाळण्यावर जोर देत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 1650 customers lost their power during the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.