१६३ ग्रामपंचायतीत प्रचार शिगेला

By Admin | Updated: July 24, 2015 02:15 IST2015-07-24T02:15:28+5:302015-07-24T02:15:28+5:30

उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून, अवघ्या २४ तासावर मतदान आल्याने उमेदवार जिवाचे रान करीत आहे.

163 Gram Panchayat Promotions Shigla | १६३ ग्रामपंचायतीत प्रचार शिगेला

१६३ ग्रामपंचायतीत प्रचार शिगेला

पुसद : उमरखेड आणि पुसद उपविभागातील चार तालुक्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून, अवघ्या २४ तासावर मतदान आल्याने उमेदवार जिवाचे रान करीत आहे. या निवडणुकीत दोन हजार ७७३ उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
पुसद उपविभागात पुसद आणि दिग्रस तालुक्यांचा समावेश आहे. दिग्रस तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ४४६ उमेदवार रिंगणात आहेत. पुसद तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी ८२८ उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत. उमरखेड उपविभागातील उमरखेड तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींमध्ये ९७० आणि महागाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींमध्ये ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. गत दहा दिवसांपासून ग्रामपंचायत रणधुमाळीने ग्रामीण वातावरण तापले आहे. पावसाची दडी आणि पिकांची स्थिती नाजूक असतानाही गावागावात केवळ निवडणुकीचीच चर्चा दिसत आहे. २५ जुलैरोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
उरमखेड तालुक्यात ५६ ग्रामपंचायतींमध्ये ४२ हजार ५०२ पुरूष तर ३७ हजार १८७ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोठ्या आणि गट ग्रामपंचायतींमध्येही निवडणुकीने वातावरण तापले असून प्रचारात तरुणांसोबत महिलांनीही आघाडी घेतली आहे. निवडणुकीत अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्या मार्फत करडी नजर ठेवली जात आहे. दररोज सविस्तर माहिती प्रशासनाला दिली जात आहे. उमरखेड तालुक्यात १७८ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी १९६ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, ५८८ मतदान अधिकारी राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच गावातही तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून, अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निवडणूक अधिकारी सचिन शेजाळ यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ढाणकीत तिरंगी लढत होत असून, प्रचार कार्याने वेग घेतला आहे. गावात ध्वनीक्षेपक, फ्लेक्स, रॅलीच्या माध्यमातून प्रचार कार्य सुरू आहे.
पुसद तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मतदारांनी उमेदवारांची झोप उडविली आहे. शेकडो मजूर मुंबई, पुण्यासारख्या महानगरात गेले आहेत. या मजुरांना संपर्क करून त्यांना गावात आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करीत आहेत. या विस्थापित मतदारांना आणण्यासाठी हजारो रूपये खर्च होणार असले तरी आपल्याच पारड्यात ते मत टाकतील याची कुणालाही खात्री देता येत नाही. महागाव तालुक्यात हिवरा, फुलासावंगी यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये लोकसभेसारखी रणधुमाळी दिसत आहे. हिवरा येथे १३ जागांसाठी २७ उमेदवार तर फुलसावंगी येथे १७ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
यासाठी प्रचारामध्ये नेते व कार्यकर्ते रात्रंदिवस एक करीत आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील नेत्यांनी गावांमध्ये ठिय्या दिला आहे. घरोघरी जावून मतदारांना विनंती करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी वाहनातूनही लाऊडस्पिकरद्वारा प्रचार सुरू आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचा भास होतो. (लोकमत चमू)

Web Title: 163 Gram Panchayat Promotions Shigla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.