१६० शेतकऱ्यांची आत्महत्या अपात्र
By Admin | Updated: December 13, 2014 02:31 IST2014-12-13T02:31:47+5:302014-12-13T02:31:47+5:30
जीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

१६० शेतकऱ्यांची आत्महत्या अपात्र
विठ्ठल कांबळे घाटंजी
जीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील १०६ कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर १६० शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत.
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ. त्यामुळे होणारी सततची नापिकी. दारिद्र्य पाचवीला पुजलेले. शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत. सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही. शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा. यातून आलेले नैराश्य. या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो या भावनेपोटी त्यांनी केलेल्या आत्महत्या.
२००९ मध्ये तर २४ पैकी केवळ दोन पात्र ठरल्या तर २२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. २०१० मध्ये २२ पैकी २१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत २९ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी १७ पात्र, नऊ अपात्र तर तीन चौकशीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या सन २००७ व २००८ मध्ये प्रत्येकी ३० झाल्यात. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत हा आकडा २९ पर्यंत गेला. सन २०११ ते ११ डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात ४३ पात्र तर ५० अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत.
शेवटच्या तीन आत्महत्येविषयी तहसीलदार एम.एम. जोरवर चौकशी करत आहे. यानंतरच त्या पात्र की अपात्र हे ठरविले जाणार आहे. कोणी विष घेवून, गळफास लावून, जाळून घेत तर कोणी विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.