१५६ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड जप्त
By Admin | Updated: June 19, 2017 00:43 IST2017-06-19T00:43:45+5:302017-06-19T00:43:45+5:30
शासकीय तूर खरेदीत गैरप्रकार झाल्याने शासनाने चौकशीचे आदेश दिले असून त्यानुसार यवतमाळ सहकार विभागाने शोध मोहीम हाती घेतली आहे.

१५६ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड जप्त
तूर खरेदी : दोन लाख ३६ हजार क्ंिवटल तुरीचा शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय तूर खरेदीत गैरप्रकार झाल्याने शासनाने चौकशीचे आदेश दिले असून त्यानुसार यवतमाळ सहकार विभागाने शोध मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील १६ बाजार समित्यातील १५६ तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे.
शासकीय तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यावरून राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात सहकार विभागाने शोध मोहीम सुरू केली. आतापर्यंत १५६ व्यापाऱ्यांचे दस्तावेज सहकार विभागाने ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १६ बाजार समित्यांमध्ये यंदा दोन लाख ३६ हजार ७०९ क्ंिवटल तूर खरेदी झाली. परंतु ही तूर दालमिलकडे गेली नाही, गोदामात दिसत नाही, त्यामुळे ही तूर नेमकी कुठे गेली, याची माहिती या शोध मोहिमेतून पुढे येणार आहे. सहकार विभागाच्या या कारवाईने व्यापारी धास्तावले आहे, तर दुसरीकडे जादा तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने तूर खरेदीबाबत चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात शोध मोहीम सुरू असून १५६ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. चौकशी करून त्यात दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.
- गौतम वर्धन
जिल्हा उपनिबंधक