१५४ एटीएममध्ये ठणठणाट
By Admin | Updated: May 11, 2017 01:04 IST2017-05-11T01:04:33+5:302017-05-11T01:04:33+5:30
नोटबंदीच्या काळासारखी चलन टंचाई पुन्हा जिल्ह्यात उद्भवली असून जिल्ह्यातील १९८ पैकी १५४ एटीएममध्ये

१५४ एटीएममध्ये ठणठणाट
जिल्ह्यात १९८ एटीएम : पैसे असलेल्या एटीएमपुढे रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नोटबंदीच्या काळासारखी चलन टंचाई पुन्हा जिल्ह्यात उद्भवली असून जिल्ह्यातील १९८ पैकी १५४ एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट आहे, तर पैसे असलेल्या एटीएमपुढे नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. ऐन पगार होण्याच्या काळातच एटीएममध्ये ठणठणाट असल्याने पगारदार चांगलेच वैतागले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९८ एटीएम आहे. त्यात सर्वाधिक एटीएम भारतीय स्टेट बँकेचे ८४ आहे. गेल्या १५ दिवसांपासून एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे पगार झाल्यानंतर ही ओरड आणखी तीव्र झाली. शहरातील प्रत्येक एटीएमचे शटर अर्धे ओढलेले दिसते, तर काही एटीएमवर पैसे नाही, एटीएम बंद असे फलक लावलेले दिसून येतात. जिल्ह्यातील केवळ ४४ एटीएममध्ये पैसे असल्याचे सांगितले जाते. त्यात अॅक्सिस बँकेचे ११ आणि सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे २३ एटीएमचा समावेश आहे. मंगळवारी दुपारनंतर स्टेट बँकेच्या शहरातील २४ पैकी निवडक एटीएममध्ये पैसे मिळू लागले.
नोटबंदीच्या काळात ग्राहक पैशासाठी बँका आणि एटीएमपुढे रांगा लावून असायचे. अगदी अशीच स्थिती गत आठ दिवसांपासून झाली. प्रत्येक एटीएममध्ये ठणठणाट आहे. ग्राहक आशेने पैसे काढण्यासाठी जातात. पंरतु तेथे पैसेच नसतात. महत्त्वाच्या कामासाठीही पैसे मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. सकाळी पैसे असलेल्या एटीएममध्ये दुपारीच पैसे संपल्याचा फलक लागलेला असतो. ग्राहक या एटीएमकडून त्या एटीएमकडे पायपीट करताना दिसतात. केंद्र सरकारने काही दिवसांपासून कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देणे सुरू केले. तेव्हापासून हीच स्थिती कायम आहे.
खात्यातील पैसे एटीएमकडे
बँकांच्या एटीएमसाठी रिझर्व्ह बँकेच्या करन्सी सेकपोस्टवरून पैसे पाठविले जातात. परंतु यवतमाळ शहरातील एटीएमसाठी येथून पैसेच मिळाले नाही. जे पैसे आले तेही अत्यल्प होते. त्यामुळे जिल्ह्यातील काही बँकांनी आपल्या खातेदारांनी बँकांमध्ये जमा केलेले पैसे एटीएमकडे वळविले आहे. त्यातून मंगळवारी काही एटीएम सुरू झाले.