१५१ शाळांत व्यसनांचे सीमोल्लंघन
By Admin | Updated: October 24, 2015 02:20 IST2015-10-24T02:20:54+5:302015-10-24T02:20:54+5:30
सर्वत्र पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी होत असताना जिल्ह्यातील शाळांनी मात्र तंबाखूजन्य पदार्थांना हद्दपार करून आगळे सीमोल्लंघन साजरे केले.

१५१ शाळांत व्यसनांचे सीमोल्लंघन
‘अॅक्शन प्लॅन’चे फलित : महागाव, आर्णीची दमदार आगेकूच
अविनाश साबापुरे यवतमाळ
सर्वत्र पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी होत असताना जिल्ह्यातील शाळांनी मात्र तंबाखूजन्य पदार्थांना हद्दपार करून आगळे सीमोल्लंघन साजरे केले. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ‘अॅक्शन प्लॅन’चा कित्ता गिरवत या नवरात्रीत तब्बल १५१ जिल्हा परिषद शाळांनी तंबाखूमुक्तीचे निकष पूर्ण केले असून जिल्ह्याची नंबर वनकडे वाटचाल सुरू केली आहे.
शाळा आणि गावे तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षीपर्यंत केवळ १६ शाळा तंबाखूमुक्त करून जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता. रायगड जिल्हा मात्र १३५ शाळा तंबाखूमुक्त करून अव्वलस्थानी आहे. त्यामुळे यवतमाळला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात तंबाखूमुक्तीचे ११ निकष ठरवून देण्यात आले होते. हे निकष ९ दिवसांत पूर्ण करण्यासाठी एक ‘अॅक्शन प्लॅन’च ठरवून देण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या चळवळीचे समन्वयक म्हणून अवधूत वानखडे यांच्याकडे जबाबादारी देण्यात आली आहे. या नऊ दिवसांत अनेक आश्चर्यकारक आणि गमतीशीर बाबीही घडल्याचे वानखडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तंबाखूमुक्तीचे वेळापत्रक काटेकोरपणे राबविण्यात आर्णी पंचायत समितीअंतर्गतच्या तब्बल ४० शाळांना यश आले आहे, अशी माहिती सलाम मुंबई फाऊंडेशनचे अजय पिलाणकर यांनी दिली. तर महागाव पंचायत समितीमधील मुडाणा, कोठारी, पोखरी, उमरखेडमधील मार्लेगाव, विडूळ केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतर्फे लवकरच त्यांना अधिकृतरीत्या तंबाखूमुक्त घोषित करण्यात येणार असल्याचे वानखडे यांनी सांगितले.
दरम्यान, येत्या बालक दिनापर्यंत म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा १०० टक्के तंबाखूमुक्त करून दाखवा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व पंचायत समित्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने कामही सुरू करण्यात आले आहे.