लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उमरखेड तालुक्यात स्कूल बस अपघातात विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. जिल्ह्यात तब्बल दीडशे अनफिट स्कूल बस धावत आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून, प्रशासन आता तरी ठोस कारवाई करणार का, असा सवाल पालक करीत आहे.
जिल्ह्यात ५५५ स्कूल बस असल्याची नोंद आरटीओकडे आहे. मात्र, रस्त्यावर धावणाऱ्या स्कूल बसची संख्या पाहता ही नोंद फारच कमी असल्याचे सांगितले जाते. आरटीओ विभागाकडून स्कूल बसची केवळ वार्षिक तपासणी होते. ऑक्टोबर महिन्यात आरटीओ विभागाने योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नसलेल्या वाहनांना नोटीस बजावली होती. यात पुढे कुठलीच कारवाई झाली नाही. उमरखेडच्या अपघातानंतर कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जिल्ह्यात १२५ ते १५० स्कूल बसेसकडेही योग्यता प्रमाणपत्र नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. पालक विश्वासाने मुलांना स्कूल बसमध्ये पाठवतात. प्रशासन याबाबत फारसे गंभीर नसल्याने जिल्ह्यात स्कूल बस 'सुसाट' झाल्या आहेत. याच मनमानी कारभारामुळे उमरखेड तालुक्यातील महिमा सरकाटे या विद्यार्थिनीचा बळी गेला. अपघातानंतर प्रशासन जागे झाले असून, विशेष मोहीम राबवीत आहे. प्रशासनाने आधीच सतर्कता दाखवली असती तर कदाचित हा अपघात टळला असता.
काय सांगतो नियम ? नवीन स्कूल बसची आठ वर्षांपर्यंत दोन-दोन वर्षांनी पासिंग करून योग्यता प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. आठ वर्षांनंतर मात्र दरवर्षी पासिंग करून वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र घ्यावे.
अखेर 'त्या' स्कूल बस चालकाला केली अटक उमरखेड : दहागाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल बसला शनिवारी अपघात होऊन इयत्ता नववीत शिकणाऱ्या महिमा सरकटे हिचा मृत्यू झाला. पसार झालेल्या चालकाला पोफाळी पोलिसांनी अटक केली. त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले संस्था चालक व प्राचार्य पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. प्रकाश गाडगे असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. अटकेनंतर सदर बस नादुरुस्त अवस्थेत असल्याचे अनेकवेळा संस्था चालक दर्शन अग्रवाल यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यानेच सदरचा अपघात घडल्याचे पोलिस जबाबात सांगितले आहे. घटना घडली त्यावेळी ३० ते ४० विद्यार्थी बसमध्ये होते. लहान चिमुकल्यांनी घटना पाहिल्याने अनेक विद्यार्थी दोन दिवसांपासून भयभीत असल्याचे पालकांनी सांगितले.
"स्कूल बस तपासणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. यात दोन अधिकारी असतील. तपासणी दरम्यान दोषी वाहनचालकांवर कारवाई करणार."- प्रशांत देशमुख, आरटीओ, यवतमाळ