हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 10:24 IST2018-03-17T10:24:35+5:302018-03-17T10:24:42+5:30
हवामानाचा अचूक अंदाज घेता यावा आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता यावे यासाठी राज्यात १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हवामानाचा अचूक अंदाज घेता यावा आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता यावे यासाठी राज्यात १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. इस्त्रोच्या तंत्रज्ञानातून राज्यात ३९१ केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेतले जाणार आहे.
हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते आहे. दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना फटका बसतो. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आजही तेवढा गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे आता अचूक अंदाज वर्तविण्यासाठी हायड्रो प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत इस्त्रोचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. राज्यात ३९१ केंद्र उभारण्यात येणार असून अमरावती विभागत त्यातील ९२ केंद्रांचा समावेश आहे. यामुळे केंद्रालगतच्या परिसरातील पावसाचा अचूक अंदाज घेता येणे शक्य होणार आहे. आद्रर्ता, उष्मांक आणि पावसाची वाटचाल आदी माहिती यामुळे मिळणार आहे. नागपूर विभागातील २९९ केंद्रांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव या प्रोजेक्टमधून दिला आहे. बाष्पीभवनपात्र, थर्मामीटर, आधुनिक पर्जन्यमापक यंत्र ११९ केंद्रांवर बंद पडले आहेत. ते पूर्ववत केले जाणार आहेत.
१३ नद्यांवर जलगुणवत्ता प्रयोगशाळा
विदर्भातील १३ नद्यांवर जलगुणवत्ता प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. पाण्याचे ५७ मापदंड तपासले जाणार आहेत. वैनगंगा, पेंच, कन्हान, बांडिया, इंद्रावती, वर्धा, पैनगंगा, तापी, प्राणहिता, पूस, वाण, चंद्रभागा आणि मन या नद्यांचा समावेश आहे. तर जलाशयांमध्ये प्रयोगशाळा साकारली जाणार आहे. त्यात काटेपूर्णा, चापडोह, अप्पर वर्धा, पेंच, गोसी खुर्द या प्रकल्पांचा समावेश आहे. या ठिकाणच्या जलाशयात व नदीपात्रात किती पाणी आहे, धोक्याची पातळी ओलांडली तर नाही ना, पाणी दूषित झाले का, कुठले घटक आहे याची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
इस्त्रोच्या तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. त्याचप्रमाणे जलाशयातील पाणीपातळी कळण्यास मदत होईल. अचूक अंदाजामुळे होणारे नुकसान टाळता येईल.
- अनंत गोरडे,कार्यकारी अभियंता
जलविज्ञान प्रकल्प, अमरावती