निळोणात १५ टक्के पाणी

By Admin | Updated: July 7, 2016 02:27 IST2016-07-07T02:27:50+5:302016-07-07T02:27:50+5:30

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे.

15% water in the den | निळोणात १५ टक्के पाणी

निळोणात १५ टक्के पाणी

वेळापत्रक बदलणार : पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार
यवतमाळ : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गत मे महिन्यापासून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या यवतमाळकरांना अद्यापतरी दिलासा मिळाला नाही. मात्र पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार जीवन प्राधिकरण करीत आहे.
यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह प्रकल्पावरून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी निळोणा प्रकल्प मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटला. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकल्प कोरडा पडला. त्यामुळे सर्व भिस्त चापडोह प्रकल्पावर होती. परंतु या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूमुळे यवतमाळकरांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आठ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात आला. जून महिन्यात मुबलक पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने व्यक्त केले होते. त्यामुळे यवतमाळकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता जुलै महिना उजाडला तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे या धरणात केवळ १५ टक्केच जलसाठा आहे.
या प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने केले असले तरी अपुऱ्या पावसामुळे ते शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे आताही यवतमाळकरांना आठ दिवसाआडच पाणी मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वापरण्यासाठी छताच्या पाण्याचा आधार यवतमाळकरांना घ्यावा लागत आहे.
मात्र लवकरच यवतमाळकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत जीवन प्राधिकरणाने दिले. आठवडाभरात जोरदार पाऊस झाला आणि निळोणा ओव्हरफ्लो झाला तर लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो. परंतु सध्या तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे चापडोह प्रकल्पातून पाणी आणून त्याचे नियोजन करून शहराला पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत यवतमाळात पाऊस अपुरा झाला आहे. धरणात पाणी नसल्याने नागरिक आठवड्यातून एकदा नळाची प्रतीक्षा करतात. पावसाळ्यातही यवतमाळकरांना टँकरची मदत घ्यावी लागत असल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. (शहर वार्ताहर)

जुलै महिन्यातही चापडोहचाच आधार
गतवर्षी झालेल्या पावसाने २२ जुलै रोजी निळोणा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यामुळे नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु यावर्षी ६ जुलैपर्यंत या प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाची भिस्त चापडोह प्रकल्पावर आहे. या प्रकल्पातून पाणी आणून ते यवतमाळ शहरात वितरित केले जाते. नगर परिषदेत नव्याने समाविष्ठ झालेल्या परिसरात ३० हजार नळ जोडणीतून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या नवीन नळ कनेक्शन देणे बंद असून पावसाळ्यानंतर नवीन नळ कनेक्शन दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या यवतमाळकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अद्यापही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.

Web Title: 15% water in the den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.