सिंचन विहिरींच्या याद्यांसाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम
By Admin | Updated: March 2, 2016 02:52 IST2016-03-02T02:52:31+5:302016-03-02T02:52:31+5:30
सिंचन विहिरींची कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात चालढकल सुरू आहे. तालुक्यातील ७२ पैकी ५१ ग्रामपंचायतींनीच या याद्या तयार केल्या.

सिंचन विहिरींच्या याद्यांसाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम
घाटंजीत आढावा सभा : मनरेगातून सिंचनाची कामे घेण्याचे निर्देश
घाटंजी : सिंचन विहिरींची कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात चालढकल सुरू आहे. तालुक्यातील ७२ पैकी ५१ ग्रामपंचायतींनीच या याद्या तयार केल्या. उर्वरित २१ ग्रामपंचायतींना याद्या पूर्ण करण्यासाठी १५ मार्चपर्यंत संधी देण्यात आली आहे. येथील पंचायत समितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आमदार राजू तोडसाम यांनी हे निर्देश दिले आहेत.
या बैठकीत प्रामुख्याने रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. १ हजार ५०६ शेतकऱ्यांच्या अर्जांपैकी १ हजार ४९ सिंचन विहिरींचे काम सुरू झाले आहे. २३४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समितीच्या मनरेगा विभागाचे उघडे यांनी यावेळी दिली.
१ मे २०१५ च्या शासन पत्रानुसार कायम प्रतीक्षा यादी तयार करण्याचे आदेश आहे. या विषयात ग्रामपंचायतींनी चालढकल केल्याबद्दल आमदार तोडसाम यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. यादी नसल्याने शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर मंजूर होत नाही. परिणामी त्यांचे नुकसान होते. याद्या तयार करण्यासोबतच प्रत्येक गावात दहा सिंचन विहिरी मंजूर कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सन २०१२ मध्ये आलेल्या पुराने खचलेल्या विहिरी दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले. ५ मार्चपर्यंत सर्व खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव सादर करून मंजुरात दिली जाईल, असे गटविकास अधिकारी मानकर यांनी यावेळी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसलेल्या गावात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे मनरेगा अंतर्गत घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. प्रत्येक ग्रामपंचायतीने ढाळीचे बांध, सिमेंट नाला बंधारा, शेततळे ही कामे मनरेगातून घ्यावी, असे सांगितले. बैठकीला पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, उपसभापती रमेश धुर्वे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)