जरा हटके! यवतमाळात १४ सर्प पिलांचा झाला आईविनाच जन्म!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:48 IST2018-10-04T21:46:13+5:302018-10-05T11:48:21+5:30
सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत.

जरा हटके! यवतमाळात १४ सर्प पिलांचा झाला आईविनाच जन्म!
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत. या प्रयोगातून वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन रिसर्च संस्थेच्या अॅनिमल केअर टेकर आणि सर्पमित्रांनी १४ पिलांना जीवदान दिले.
अॅनिमल रेस्क्यूअर सुमित आगलावे यांना शहरातील एका घरून कॉल आला. तिथे झाडांच्या कॅरिमध्ये सापाची १४ अंडी आढळली. ती त्यांनी अलगद मातीसह उचलून आणली. संस्थेचे अभ्यासक अंकित टेंभेकर यांनी कृत्रिमरित्या ह्युमिडिटी बॉक्स तयार केला. ३२ दिवस अंड्यांची जोपासना केल्यानंतर १४ पिलांचा जन्म झाला.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गावंडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक अमित शिंदे, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन रिसर्च संस्थेचे स्वेतल लांडगे, कार्तिक लांडगे, साहील महाजन, अक्षय मोहनापुरे, विक्की कुटेमाटे, अजय वर्मा, पवन दळवी, शुभम वाघाडे, धीरज सयाम यांनी या पिलांना निसर्गाच्या सानिध्यात सोडले. अंडी कृत्रिमरीत्या उबविण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
असा असतो नानेटी साप
नानेटी हा साप बिनविषारी असून ८० ते ९० सेमी लांब असतो. शरीरावर मऊ खवले असतात. पाठ तपकिरी असून प्रत्येक खवल्याला निळसर काळ्या रंगाची कडा असते. डोक्यापासून शेपटापर्यंत काळा किंवा तपकिरी रूंद व लांब पट्टा असतो. पोटाकडील बाजू पिवळसर असते. डोके चपटे असून डोळे मोठे असतात. वरचा ओठ पिवळा असतो. मादी ५ ते २५ अंडी घालते. हा साप झाडावर वेगाने चढतो. साधारण १० ते २० मीटर उंचीवरून तो उडी मारतो.