१३५ घरांची पडझड
By Admin | Updated: August 5, 2015 23:59 IST2015-08-05T23:59:55+5:302015-08-05T23:59:55+5:30
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बरसलेल्या धुव्वांधार पावसाने जिल्ह्यात सर्वसामान्यांची दाणादाण झाली. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला.

१३५ घरांची पडझड
धुव्वाधार पाऊस : १९ कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले
यवतमाळ : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बरसलेल्या धुव्वांधार पावसाने जिल्ह्यात सर्वसामान्यांची दाणादाण झाली. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. जिल्ह्यात १३५ घरांची पडझड झाली असून १६ शेळ्या वाहून गेल्या. २४ तासात सरासरी ८६ मिमी पाऊस कोसळला असून जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४४.३३ टक्के पाऊस कोसळला आहे.
गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने यवतमाळ शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तलाव फैलातील तलावाकडे जाणाऱ्या नाल्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून पडली. त्यामुळे तलावात जाणारे पाणी तुंबून परिसरातील तलावफैल, गवळीपुरा भागातील अनेक घरात शिरले. या भागातील ६० घरे पाण्याखाली आली. यातील १९ कुटुंबांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मध्यरात्री घरात पाणी शिरल्याने या भागात चांगलीच तारांबळ उडाली. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे आणि उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाल्यात अडकलेली जलपर्णी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात केली.
या भागातील नगरसेवक आणि सभापती प्रणिता खडसे, विजय खडसे यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांना लगतच्या शाळेत हलविण्यात आले. या पाण्याचा फटका माला ढोक, पुष्पा गिरी, मीरा वासनिक, विनोद खोडे, पार्वती भलावी, रमा गजभिये, देवराव मेश्राम, मीरा वासनिक यांच्यासह अनेकांना बसला.
शहरालगतच्या पिंपळगाव परिसरातील रोहिलेबाबा नगरातील ३५ घरांमध्ये पाणी शिरले. विशेष म्हणजे या भागात रस्ते आणि विजेचा अभाव आहे. त्यामुळे मदत करताना अडचणी निर्माण झाल्या. यासोबतच वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटी, रोहिदासनगर, सिंघानियानगर भागात पाणी शिरले. नागरिकांनी रात्र जागून काढावी लागली.
यवतमाळ तालुक्यातील बोरी गोसावी, रामनगर, वाई हातोला, सावरगड, लोणबेहळ येथील काही घरांची पडझड झाली. तर बाभूळगाव शहरातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथे गोठ्याची भिंत कोसळली. (शहर वार्ताहर)