मारेगाव : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या व शेत मालाच्या पडत्या किंमतीमुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील १३४ शेतकऱ्यांनी आत्मघात करून जीवनयात्रा संपविली. गेल्या १४ वर्षांत त्यांनी आत्महत्या केल्या आहेत.गेल्या १४ वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या १३४ शेतकऱ्यांपैकी केवळ ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय शासकीय मदतीस पात्र ठरले आहे. त्यांना प्रत्येकी लाखांची मदत देण्यात आली आहे. निकषात न बसल्याच्या कारणामुळे ९२ शेतकरी कुटुंब या मदतीपासून वंचित राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला केवळ एक लाखाची मदत देताना शेत मालाला योग्य भाव, कर्जमाफी, बिनव्याजी कर्ज, भारनियमनमुक्ती, सिंचनाच्या सोयी, शेतीविषयक मार्गदर्शन या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्याप सुरू असताना यावर्षी पुन्हा नापिकीने भर घातली आहे. आधी अल्पवृष्टीने शेतकऱ्यांचा घात केला. त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना हादर बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने घात केला. परतीच्या पावसात पुन्हा खरीपातील पिके संकटात सापडली आहे. खरीपातील भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी रबीवर भीस्त ठेवली.मात्र रबीनेही शेवटी घातच केला. रबी पीक ऐन जोमात असताना पुन्हा पावसाने दणका दिला. ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाने रबी पिकांना फटका बसला. ऐन सवंगणीच्या काळातच वादळाने गहू आणि हरभरा पिकाला दणका दिला. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
१४ वर्षांत १३४ आत्महत्या
By admin | Updated: March 22, 2015 02:09 IST