१३०० शिक्षकांनी चोरली जात
By Admin | Updated: June 15, 2016 02:47 IST2016-06-15T02:47:43+5:302016-06-15T02:47:43+5:30
जातीच्या आधारावर सवलती लाटणाऱ्या येथील तब्बल १३०० शिक्षकांनी दीड वर्षांपासून निर्देश देऊनही आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.

१३०० शिक्षकांनी चोरली जात
जिल्हा परिषद : दीड वर्षांपासून निर्देश देऊनही जातवैधता प्रमाणपत्रास टाळाटाळ
यवतमाळ : जातीच्या आधारावर सवलती लाटणाऱ्या येथील तब्बल १३०० शिक्षकांनी दीड वर्षांपासून निर्देश देऊनही आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह लागले असून शिक्षकांनीच जात चोरल्याचे पुढे येत आहे. जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने अनेक प्रक्रियाही रखडल्या आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षकांचे बनावट अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या शिक्षकांची तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी अनेक शिक्षकांनी पळ काढला होता. तर चौकशी झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी आपले अपंगत्वाचे प्रमाणपत्रच मागे घेतले होते. याच पद्धतीने आता जिल्हा परिषदेत पदस्थापना मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी जात चोरल्याचे पुढे आहे. अशा शिक्षकांकडून जातीचा लाभ घेतला जात आहे. मात्र त्यासंदर्भात कोणतेच अधिकृत प्रमाणपत्र सादर केले जात नाही. या शिक्षकांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर १३०० एवढी आहे. जातीच्या नावाने फायदा लाटणाऱ्या शिक्षकांना दीड वर्षापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अद्यापपर्यंत या शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र दिले नाही. वारंवार सूचना देऊनही शिक्षक जात वैधता प्रमाणपत्र देण्यास तयार नाही.
शिक्षकांनी जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर रखडले आहे. बिंदूनामावली तयार केल्याशिवाय रोस्टर काढता येत नाही, ही अडचण दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांची वेतन वाढ रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही प्रमाणपत्र दिले नाही आणि शिक्षकांवरही कारवाई झाली नाही. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी अशा शिक्षकांंना सेवेतून थेट बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अर्धे अधिक शिक्षकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. मात्र कारवाई टाळण्यात पटाईत असलेल्या या शिक्षकांनी आता यातून आपली कशी सुटका करून घ्यावी, यासाठी आराखडे रचने सुरू केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)