१२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे
By Admin | Updated: November 2, 2016 00:56 IST2016-11-02T00:56:01+5:302016-11-02T00:56:01+5:30
जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. परतीच्या पावसाने त्यामध्ये भर घातली.

१२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे
उद्दिष्ट वाढविले : अखंड वीज पुरवठ्याचा प्रश्न मात्र कायम, हरभऱ्याची लागवड वाढणार
रूपेश उत्तरवार यवतमाळ
जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. परतीच्या पावसाने त्यामध्ये भर घातली. यामुळे यावर्षी तीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. या पेरणीला कुठलाही अडसर निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. याकरिता १२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे जिल्ह्याला मंजूर झाले आहे. तर खरिपातील ६०० कोटींचे कर्जवाटप रब्बीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. यासाठी १२ नोव्हेंबरला पुण्यात अग्रणी बँकांची बैठक बोलावण्यात आली आहे. रब्बीचे नियोजन विजेवर अवलंबून आहे. १२ तास अखंड वीज पुरवठ्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात वारंवार वीज खंडित होत आहे. यावर ठोस उपाय झाल्यास खरीप गेला तरी रब्बीतून स्थिती सुधारण्यास पूर्णत: मदत होणार आहे.
जिल्ह्यातील खरीप पिकाला परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. परतीच्या पावसाच्या जोरावरच शेतीचे रूप पालटावे म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने पूर्ण नियोजन केले आहे. दरवर्षी सरासरी एक लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होते. यावर्षी हे क्षेत्र तीन लाख २० हजार हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले आहे. केवळ क्षेत्राचाच विस्तार नाही, तर रब्बीचा पेरा पूर्णत्वास जाण्यासाठी संपूर्ण बारकावे तपासले जात आहे.
यावर्षी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. त्याकरिता ५५ हजार क्विंटल अनुदानित बियाण्याची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी ६०३० क्विंटल अनुदानित बियाणे मंजूर झाले. जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर सहा हजार क्विंटल अनुदानित बियाण्याचा टप्पा नव्याने मंजूर झाला. असे १२ हजार क्विंटल अनुदानित बियाणे महाबिज कंपनी जिल्ह्याला देणार आहे.
क्विंटलमागे २५०० रूपयांचे अनुदान
हरभऱ्याचे दर सर्वाधिक तेज आहे. यामुळे हरभरा बियाण्याचे खुल्या बाजारातील दर १२० ते १५० रूपयांपर्यंत वधारले आहे. महाबीज कंपनी शेतकऱ्यांना ८० रूपये किलो दराने बियाणे देणार आहे. यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे २५०० रूपयाचे अनुदान मिळणार आहे.
६०० कोटींचे कर्ज वळते करण्याच्या हालचाली
खरिपातील कर्ज वितरणात बँकांनी आखडता हात घेतला. उद्दिष्टाच्या ६५ टक्के कर्जाचेच वाटप केले. रब्बीसाठी ५३ कोटींच्या कर्ज वितरणाचे नियोजन आहे. ही रक्कम वाढीव क्षेत्रासाठी अपुरी आहे. शिवाय खरिपात बँकांनी ३५ टक्के कर्ज वितरित केले नाही. यामुळे ६०० कोटी रूपयांचे कर्ज रब्बीत वळते करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुण्यात बैठक बोलावली आहे. अग्रणी बँकांचा आढावा घेतला जाणार आहे. खरिपात कर्ज न देणाऱ्या बँकांचा रब्बीसाठी आढावा घेतला जाणार आहे. धरणातील पाण्यासोबत सिंचन विहिरी आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओलित करण्यासाठी १२ तास वीज पुरवठा देण्यासाठी वीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे. वीज पुरवठा न देणाऱ्या केंद्राचा अभ्यास केला जाणार आहे. सध्या खंडित वीज पुरवठ्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे. यावर तत्काळ उपाययोजना झाल्यास रब्बीचे क्षेत्र सुधारण्यासोबत रात्रीच्या ओलिताचा प्रश्न निकाली निघणार आहे.