दराटीच्या पूरग्रस्त नागरिकांना दिले १२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST2021-08-28T04:46:35+5:302021-08-28T04:46:35+5:30
जिल्हा परिषदेचा पुढाकार : अध्यक्ष, सभापतींनी शब्द पाळला उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा अभयरण्यामधील बंदी भागातील दराटी येथे आठ ...

दराटीच्या पूरग्रस्त नागरिकांना दिले १२ लाख
जिल्हा परिषदेचा पुढाकार : अध्यक्ष, सभापतींनी शब्द पाळला
उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा अभयरण्यामधील बंदी भागातील दराटी येथे आठ दिवसांपूर्वी पुरामुळे अनेक घरे पाण्याखाली आली. गावात आणि शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले. या भागाची जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी पाहणी करून अवघ्या तीन दिवसात गावाला १२ लाख रुपये जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे.
मुसळधार पावसामुळे दराटीलगत असलेल्या तलावातील पाणी ओव्हरफ्लो होऊन दराटी गावाला पुराचा विळखा पडला होता. ७० कुटुंबांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलविले होते. यात अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. शिवाय शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नेत्यांनी गावाला भेटी दिल्या. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुराची कारणे शोधून ती मुळातून दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या जाव्यात, यासाठी प्रयत्नशील असल्याचे वचन त्यांनी दिले होते.
देवसरकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांच्यासमोर परिस्थिती मांडली. त्यांनी लगेच सेस फंडातून सहा लाख ७५ हजार रुपये तत्काळ मंजूर केले. त्यातून नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम केले जाणार आहे. त्याच्या निविदासुध्दा तातडीने बोलविण्यात आल्या आहे.
दराटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये गाळ साचून शालेय साहित्य व खोल्यांचे प्रचंड नुकसान झाले. शिक्षण सभापती श्रीधर मोहोड यांनी शाळा दुरुस्तीकरिता पाच लाखांचा निधी मंजूर केला. शाळा व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली लवकरच शाळेची डागडुजी आणि इतर शालेय गोष्टीवर भर देऊन काम केले जाणार आहे. भविष्यामध्ये गावाला पुराचा फटका बसू नये व नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, याकरिता जास्त निधी देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राम देवसरकर यांनी दिली.
राम देवसरकर
बांधकाम सभापती,जिल्हा परिषद, यवतमाळ.
बॉक्स
पंचायत समितीत जनसंवाद
दराटी येथील नागरिकांनी बुधवारी पंचायत समितीत जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्याशी जनसंवाद साधला. गावकऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. निव्वळ भेट व आश्वासन न देता कोणताही विलंब न लावता प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कोट
दराटी येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर केला. शैक्षणिक दृष्टिकोनातून ही बाब महत्त्वाची होती. त्यामुळे त्वरित निर्णय घेतला.
श्रीधर मोहोड, सभापती, शिक्षण व आरोग्य, जिल्हा परिषद, यवतमाळ
दराटी येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पाणी गाव, तांड्यातील घरात शिरले. त्यामुळे तेथील नागरिकांचे नुकसान झाले. नाला खोलीकरण व सरळीकरण करणे अत्यावश्यक आहे. ही बाब जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती राम देवसरकर, सदस्य रेखा आडे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर तातडीची उपाययोजना म्हणून निधी मंजूर केला. ही कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
कालिंदा पवार, अध्यक्ष, जिल्हा परिषद, यवतमाळ