१२ कुटुंबांच्या उपोषणाची दखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:12 IST2017-12-10T22:12:27+5:302017-12-10T22:12:44+5:30

१२ कुटुंबांच्या उपोषणाची दखल नाही
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : अतिक्रमित जागेवर ३० वर्षांपासून राहणाऱ्या १२ मागासवर्गीय कुटुंबांची घरे प्रशासनाने बुलडोजरने पाडली. आता ही कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मात्र, प्रशासनाने साधी भेट देण्याचे औचित्यही दाखविलेले नाही.
पळसवाडी कॅम्प चपराशी क्वॉर्टर परिसरात हे झापडपट्टीधारक गेल्या ३० वर्षांपासून कच्ची घरे बांधून राहात आहेत. परंतु, १६ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वसूचना न देता ही घरे बुलडोजरने पाडली. त्यामुळे बेघर झालेल्या या कुटुंबापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. थंडीच्या दिवसात चिमुकल्या मुलाबाळांसह हे लोक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ५ डिसेंबरपासून उपोषणाला बसले.
आम्हाला साधे पिण्यास पाणी नाही, शौचालय नाही, हाताला काम नाही अशा अवस्थेत आता राहते घरही गेल्याने आम्ही उघड्यावर आलो, अशी व्यथा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडे घरकुलासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु, नगरपरिषदेने त्यावर अजूनही कार्यवाही केलेली नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वप्रथम आमच्यासारख्या अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्यावी, अशी मागणी या १२ कुटुंबांनी केली.
दरम्यान, पालकमंत्र्यांना भेटण्यास गेल्यावरही त्यांनी भेट नाकारल्याचे गणेश भांडवले या उपोषणकर्त्याने सांगितले. गणेश भांडवले यांच्यासह कविता भांडवले, खुशाल मेश्राम, चैतन्या मेश्राम, शांताबाई गवळी, राजू गवळी, वैभव वासनिक, दीपमाला वासनिक, धर्मपाल उके, सरिता उके, ज्योती पोयाम, कमलाबाई लांजेवार, विरेंद्र लांजेवार, कविता लांजेवार, शेवंताबाई गेजीक, मंगला जायगुडे, दुर्गा गवळी, सुनिता वानखडे, संजय वानखडे, सुरज लोंढे, रोशनी लोंढे, विठाबाई ससाने, शंकर ससाने, संतोष ससाने, प्रदीप ससाने, शकुंतलाबाई ससाने, उत्तम डवरे, इंदूबाई डवरे, सुभाष मुनेश्वर, प्रजापती मुनेश्वर, जुबेदाबाई खान आदी उपोषणाला बसले आहेत.